सध्या अतुल जगदाळे दिग्दर्शित ''गणवेश'' या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध छायाचित्रकार अतुल जगदाळे दिग्दर्शनामध्ये पदार्पण करीत आहेत. वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजूराच्या मुलाला गणवेशासाठी काय संघर्ष करावा लागतो याची कथा ''गणवेश'' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या चित्रपटात किशोर कदम, स्मिता ताम्बे आणि मुक्ता बर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मागील काही वर्षात छायाचित्रकार ते दिग्दर्शक असा प्रवास केलेल्या छायाचित्रकारांमध्ये संजय जाधव, महेश लिमये, लक्ष्मण उतेकर, अविनाश अरुण, राहुल जाधव आणि केदार गायकवाड प्रमुख आहेत.
संजय जाधव तर सातत्याने ''चेकमेट'', ''रींगा रींगा'', ''फक्त लढ म्हणा'', ''दुनियादारी'' आणि ''प्यारवाली लव स्टोरी'' असे यशस्वी चित्रपट देऊन मराठी चित्रपट सृष्टित आघाडीचे दिग्दर्शक म्हणून प्रस्थापित झाले आहे. त्यांच्या ''दुनियादारी'' या चित्रपटाने मराठी चित्रपटांमध्ये नविन विक्रम निर्माण केले. त्यांचा आगामी ''तू ही रे'' हा चित्रपट येत्या सप्टेम्बर महिन्यात प्रदर्शित होतोय. या चित्रपटात प्रेक्षकांची आवडती जोडी स्वप्निल जोशी व सई ताम्हणकर प्रमुख भूमिकेत आहे.
''उत्तरायण'', ''कॉर्पोरेट'', ''ट्रैफिक सिंगल'', ''फैशन'', ''दबंग'', ''नटरंग'', ''बालगंधर्व'', ''बालक पालक'' आणि ''हिरोइन'' अश्या गाजलेल्या हिंदी व मराठी चित्रपटाचे छायाचित्रकार महेश लिमये यांनी मागील वर्षी अप्रैल २०१४ मध्ये ''येलो'' हा अतिशय वेगळा विषय असलेला चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाला प्रेक्षक व समीक्षक दोघांची कौतुकाची पावती मिळाली. गौरी गाडगीळ, मृणाल कुलकर्णी, उपेन्द्र लिमये आणि ऋषिकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष जूरी पुरस्कार मिळाला होता. तर चित्रपटाची नायिका गौरी गाडगीळ व संजना रॉय यांना विशेष उल्लेख पुरस्कार मिळाला होता.
''ब्लू'', ''इंग्लिश विंग्लिश'', ''बॉस'', ''लेकर हम दिवाना दिल'' आणि ''तेवर'' या हिंदी चित्रपटांचे छायाचित्रकार लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला त्यांचा पहिला मराठी चित्रपट ''टपाल'' मागील वर्षी सप्टेम्बर २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. नंदू माधव व वीणा जामकर अभिनीत ''टपाल'' नंतर आता ''लालबागची राणी'' हा त्यांचा नवीन मराठी चित्रपट घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटिला येत आहेत.
युवा छायाचित्रकार अविनाश अरुण यांनी दिग्दर्शित केलेल्या ''किल्ला'' या चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये ''सर्वोकृष्ट मराठी चित्रपट'' म्हणून गौरवण्यात आले. हा चित्रपट या वर्षी जून महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी कोकणात घडणारी कथा अतिशय सुंदरपणे साकारली होती.
लहान मुलांच्या तरल भावविश्वाचे दर्शन करवणाऱ्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात तीन कोटींची कमाई करून आशयघन चित्रपट चांगली कमाई करू शकत नाही हा समज खोटा ठरविला.
छायाचित्रकार राहुल जाधव यांचा ''मर्डर मेस्ट्री'' हा चित्रपट या वर्षी जुलाई महिन्यात प्रदर्शित झाला. ''विजय असो'' आणि ''हैलो नंदन'' नंतर हा त्यांचा तीसरा चित्रपट होता. हिंदीतील प्रसिद्द निर्माता नाडीयाडवाला
यांची निर्मिती असलेल्या ''मर्डर मेस्ट्री'' ने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
जुलाई महिन्यातच प्रदर्शित झालेल्या ''ऑनलाईन बिनलाईन'' च्या निमित्ताने केदार गायकवाड यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. सिद्धार्थ चांदेकर व हेमंत ढोमे अभिनीत या चित्रपटातून आजच्या युवा पिढीची सोशल मीडिया विषयी असलेली क्रेज असा विषय मांडण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षक व समीक्षकांनी गौरवले पण मराठी चित्रपटाच्या भाऊगर्दी मुळे या चित्रपटाला नुकसान सोसावे लागले.
२०१४ व २०१५ या वर्षात छायाचित्रकारांनी दिग्दर्शनात पदार्पण करून नवनवीन विषय संवेदनशीलपणे हाताळले. त्यांच्या चित्रपटांना अनेक पुरस्कार मिळाली, प्रेक्षकांचे व समीक्षकांचे कौतुक मिळाले. अशाच प्रकारे येणाऱ्या काळात ही आपल्याला त्यांच्या कडून नवनवीन प्रयोग बघायला मिळतील अशी अपेक्षा करुया. छायाचित्रकारांनी दिग्दर्शित केलेले सर्वच चित्रपट यशस्वी झाले असे नाही मात्र ते चित्रपट देखणे होते हे मात्र नक्की !!!!
No comments:
Post a Comment