Saturday 29 November 2014

''प्रकाशवाटा'' ते ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो''

मी आज ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' बघितला, हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्याची इच्छा होती पण एकूण कामाचा व्याप बघता ते आज शक्य झाले. आज चित्रपट प्रदर्शित होऊन ५१ दिवसानंतरही हा चित्रपट बघण्यासाठी बऱ्यापैकी गर्दी होती. ८व्या आठवड्यातही हा चित्रपट गर्दी खेचतोय हेच ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो''चे व मराठी चित्रपटाचे मोठे यश आहे.

जवळपास तीन वर्षापुर्वी ''मी सिंधुताई सपकाळ'' बघितला होता, हा चित्रपट सिंधुताई सपकाळ यांच्या ''मी वनवासी'' या आत्मचरित्रावर आधारित होता. आत्मचरित्रावर आधारित हा एक उत्तम चित्रपट आहे. ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' याच परंपरेतला चित्रपट आहे. 

या वर्षाच्या सुरुवातीला मी डॉ प्रकाश आमटे यांचे आत्मकथन ''प्रकाशवाटा'' वाचले होते, त्यात त्यांनी वर्णन केलेले हेमलकसा मधील सुरुवातीचे दिवस, त्यांना आलेल्या अडचणी, अनुभव सगळेच अंगावर काटा आणणारे होते. हे पुस्तक वाचल्यावर तुम्ही संवेदनशील झाल्याशिवाय राहत नाही. कमी अधिक प्रमाणात हाच अनुभव ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' बघून येतो.

डॉ प्रकाश बाबा आमटे यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत मिळून हेमलकसा येथे जंगलात शून्यातून विश्व उभारले. विविध समस्यांना तोंड देत, तेथील आदिवासी समाजाला प्रतिकूल परिस्थितीत आयोग्यसेवा उपलब्ध करून दिली. तेवढ्यावरच न थांबता तिथे शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देत, तेथील आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ते करीत आहेत.

एक चित्रपट न्हणुन ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' मध्ये काही उणिवा असल्या तरी या चित्रपटाची कथा थेट मनाला भिडणारी आहे. विश्वास वाटायला कठीण अशी ही सत्यकथा आहे. नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, मोहन आगाशे यांच्या सोबतच सर्व सहकलाकारांचा अभिनय अगदी प्रभवशाली आहे. वास्तविक लोकेशन्सवर चित्रपट चित्रित झाल्यामुळे चित्रपटाचा प्रभाव वाढवण्यास मदत झाली आहे. चित्रपट बघताना प्रेक्षक हरवून जातातच पण चित्रपट संपल्यावर येणारे आमटे कुटुंबिय व कार्यकर्ते यांचे फोटोज बघण्यासाठी पण थांबतात, यासाठी आपण खास करून समृद्धि पोरे यांचे अभिनन्दन करायला हवे ज्यांनी हे प्रेरणादायी कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यास मदत केली आहे.

या चित्रपटात बऱ्याच वैद्यरभीय व नागपूरच्या कलाकारांनी अभिनय केला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून विदर्भात चित्रीकरण झालेल्या चित्रपटात आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे.

''प्रकाशवाटा'' ते ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' मधील मुख्य प्रेरणा आहे, बदल. ज्या प्रकारे डॉ प्रकाश बाबा आमटे यांनी गडचिरोलीच्या आदिवासी समाजात सकारात्मक बदल घडून आणला आहे. त्याच प्रकारे आपण स्वत मध्ये व आपल्या समाजात काय सकारात्मक बदल घडून आणतो हेच महत्वाचे आहे. 

Friday 28 November 2014

''स्वामी पब्लिक लिमिटेड'' आणि ''हैप्पी जर्नी''

आज मराठीतील दोन दिग्गज दिग्दर्शकांचे चित्रपट प्रदर्शित झालेत,  गजेन्द्र अहिरे यांचा ''स्वामी पब्लिक लिमिटेड'' व सचिन कुंडलकर यांचा ''हैप्पी जर्नी''. 

आज प्रदर्शित झालेला गजेन्द्र अहिरे यांचा ''स्वामी पब्लिक लिमिटेड'' श्रद्धेचा बाजार या विषयावर आधारित आहे. ''स्वामी पब्लिक लिमिटेड''च्या माध्यमातून विक्रम गोखले, विनय आपटे, सुबोध भावे व चिन्मय मंडलेकर या जुन्या व नव्या कसदार अभिनेत्यांचा अभिनय बघायला मिळणार आहे.      

''अय्या'' मधून हिंदित पदार्पण केल्यानंतर सचिन कुंडलकर पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे त्यांचा नविन सिनेमा ''हैप्पी जर्नी'' घेऊन. या चित्रपटामध्ये अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, पल्लवी सुभाष यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Friday 21 November 2014

''विटी दांडू'' आणि ''मामाच्या गावाला जाऊया''

आज दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत ''विटी दांडू'' आणि ''मामाच्या गावाला जाऊया''.

''विटी दांडू'' ही स्वत्रंतपूर्व काळातील नातू व आजोबा यांच्या नाते सम्बन्धावर आधारित गोष्ट असून या चित्रपटात आजोबाची भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी साकारली आहे. गणेश कदम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले अाहे. अजय देवगण फिल्म्स या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करीत आहे.

आज प्रदर्शित झालेला दूसरा चित्रपट ''मामाच्या गावाला जाऊया'' हा पूर्णपणे जंगलात निर्मित पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर हेमंत जोशी यांनी केलेले आहे. मामाच्या गावाला जाणे याचा अर्थ धमाल, मौजमजा असा असतो त्यामुळे ''मामाच्या गावाला जाऊया'' हे शीर्षक नक्कीच प्रेक्षकांना आकर्षित करेल अशी अपेक्षा करुया.

''डॉ प्रकाश बाबा आमटे'' या चित्रपटाला सहाव्या आठवड्यात ही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय व मागच्या आठवड्यात प्रदर्शित ''एलिजाबेथ एकादशी''ला ही प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे त्यामुळे या चित्रपटाशी आज प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना स्पर्धा करावी लागणार आहे. पुढील आठवड्यात ''स्वामी पब्लिक लिमिटेड'' व  ''हैप्पी जर्नी'' हे दोन  बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होत आहेत.    

Wednesday 19 November 2014

एलिजाबेथ एकादशी - चित्रपट समीक्षा

लहान मुलांवर आधारित मराठी चित्रपटाचा ''श्वास''पासून सुरु झालेला प्रवास टिंग्या, फंड्री व टपाल, ते आता ''एलिजाबेथ एकादशी'' पर्यन्त येऊन पोहचलाय.

एक चांगली कथा, एक प्रतिभावंत दिग्दर्शक व त्याला कलाकारांच्या उत्तम अभिनयाची साथ मिळाली की ''एलिजाबेथ एकादशी''चा योग येतो. मुळात या चित्रपटामध्ये कुठलाही प्रसिद्ध कलाकार नाही पण सर्वच बाल कलाकारांनी अगदी धमाल केली आहे. त्याला सर्वच कलाकारांनी मोलाची साथ दिली आहे. ''एलिजाबेथ एकादशी''ची वन-लाइन स्टोरी खुप गंभीर अाहे पण ती कथा परेश मोकाशी यांनी खूपच मनोरंजक पद्धतीने सादर केल्यामुळे चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही. एका क्षणाला हसवणारा व दुसऱ्याच क्षणाला अन्तर्मुख करायला लावणारा असा एलिजाबेथ एकादशी आहे. वैज्ञानिक न्यूटन काय न्हणतात? ते तुम्हाला माहित असेलच पण संत न्यूटन काय न्हणतात? ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला ''एलिजाबेथ एकादशी'' बघावा लागेल.  

पंढरपूरच्या वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरमध्ये राहणाऱ्या ''ज्ञानेश'' या मुलाची, त्याच्या कुटुंबाची, त्याच्या ''एलिजाबेथ'' या त्याच्या सायकलवर असलेल्या त्याच्या प्रेमाची व त्याच्यापोटी त्यांने केलेल्या संघर्षाची ही गोष्ट आहे. या चित्रपटातील पात्र तुम्ही तुमच्या आजुबाजूला पण बघु शकता. काही प्रसंगात तुमचे लहानपण किवा तुमच्या मुलांचे लहानपण तुम्हाला आठवण्याची शक्यता आहे.
  
हा पूर्णपणे दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. अगदी कला दिग्दर्शनापासून ते छायाचित्रण सगळ्याच बाबीत चित्रपट सरस झाला आहे. या चित्रपटात एकच गाणे आहे ते चित्रपटाच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत आपली सोबत करते, पण पूर्ण चित्रपटांमध्ये पार्श्वसंगीताचाही महत्वाचा वाटा आहे. चित्रपटाचा कालावधी फक्त १ तास व ३० मिनट असणे हे पण ''एलिजाबेथ एकादशी''चे बळस्थान आहे.   

चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत गुंतवून ठेवणारा ''एलिजाबेथ एकादशी'', मराठी येणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून बघायला हवा …

Sunday 9 November 2014

एलिज़ाबेथ एकादशी

''हरीचंद्राची फैक्टरी''नंतर आता परेश मोकाशी ''एलिज़ाबेथ एकादशी'' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांचा हा नवीन मराठी चित्रपट येत्या शुक्रवारी १४ नवंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी खुप उत्सुकता दिसून येत आहे. फेसबुकवर या चित्रपटाच्या पेजला एका महिन्यातच जवळपास २५ हजार लाइक्स मिळालेले आहेत. या पेजच्या माध्यमातून अतिशय कल्पकपणे या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आहे. 

एलिज़ाबेथ व एकादशी या एकमेकांशी कुठल्याही प्रकारे सम्बन्ध नसलेल्या शब्दांना जोडून या चित्रपटाला ''एलिज़ाबेथ एकादशी'' असे नाव ठेवण्यात आलेले आहे. या चित्रपटाची कथा पंढरपुरमध्ये राहणाऱ्या मुलावर आधारित आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सायकलचा अतिशय सुंदरपणे वापर करण्यात आलेला आहे. कदाचित या चित्रपटामध्ये एलिज़ाबेथ हे ह्या सायकलचे नाव असावे. नक्की काय ते तर येत्या शुक्रवारीच कळणार आहे.

Saturday 8 November 2014

स्वामी पब्लिक लिमिटेडच्या निमित्ताने

गजेन्द्र अहिरे यांचा नवीन चित्रपट ''स्वामी पब्लिक लिमिटेड'' येत्या २८ नवंबरला प्रदर्शित होतोय. मागील एका दशकापासून सातत्याने वेगवेगळ्या विषयावर दर्जेदार चित्रपटाची मेजवानी प्रेक्षकांना देणाऱ्या गजेन्द्र अहिरे यांचा हा नवीन चित्रपट ''श्रद्धेचा बाजार'' या विषयवार आधारित आहे. ''स्वामी पब्लिक लिमिटेड''च्या माध्यमातून विक्रम गोखले, विनय आपटे, सुबोध भावे व चिन्मय मंडलेकर या जुन्या व नव्या कसदार अभिनेत्यांचा अभिनय बघायला मिळणार आहे.        

गजेन्द्र अहिरे यांनी त्यांच्या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग केले आहेत, सोबतच समाजातील विविध समस्यांचा विचार करून त्यांना मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांच्या समोर आणले आहे. उदाहरणार्थ त्यांनी ''त्या रात्री पाऊस होता'' व ''पारध''च्या माध्यमातून राजकारणावर भाष्य केले आहे. ''पिपानी'' च्या माध्यमातून त्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या उपरोधक पद्धतीने मांडल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात त्यांनी कुठल्यातरी सामाजिक समस्येचा उहापोह केलेला दिसतो. 

या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी ''नितिन देसाई'' व ''चंद्रकांत कुलकर्णी'' यांच्यासारख्या दिग्दर्शकांना सुद्धा दिग्दर्शित केले आहे. अलीकडे त्यांनी मकरंद अनासपुरे यांना पारध, सुंभराण, पिपाणी आणि अनवटच्या माध्यमातून वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांपुढे आणले आहे. गजेन्द्र अहिरे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.  

Friday 7 November 2014

''बोल बेबी बोल'' आणि ''गोष्ट तिच्या प्रेमाची''

आज ''बोल बेबी बोल'' आणि ''गोष्ट तिच्या प्रेमाची'' हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत.

स्व. विनय लाड दिग्दर्शित ''बोल बेबी बोल'' विनोदी चित्रपट असून यामध्ये मकरंद अनासपुरे, अनिकेत विश्वासराव व नेहा पेंडसे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सोबतच अरुणा ईरानी या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

आज प्रदर्शित झालेला दूसरा चित्रपट नरेंद्र ठाकुर दिग्दर्शित ''गोष्ट तिच्या प्रेमाची'' हि प्रेमकथा आहे.    .  

Thursday 6 November 2014

क्लासमेट्स

उलाढाल, सतरंगी रे आणि नारबाची वाड़ी नंतर नव्या पिढीतील मराठी दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा ''क्लासमेट्स'' हा नवीन मराठी चित्रपट पुढील वर्षी १६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, सचित पाटिल, सुशांत शेलार व सिद्धार्थ चांदेकर अशी तगड़ी स्टारकास्ट असणारा हा सिनेमा कॉलेज मधील विद्यार्थांची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे व त्याला विद्यार्थी संघटनांमधील राजकारणाची जोड आहे असे ट्रेलर मधून दिसते. 

या चित्रपटाचा ट्रेलर सध्या यूटुबवर गाजतोय. विविध रंगाच्या अक्षरांच्या रुपात असलेल्या ''क्लासमेट्स''च्या टाइटल प्रमाणे त्यांच्या ट्रेलर मध्ये ही रंगाची उधळण केली आहे जी नक्कीच डोळ्यांना सुखावणारी आहे. ''क्लासमेट्स'' त्यांच्या ट्रेलर मधून चित्रपटाविषयी उत्सुकता जागवतो, सोबतच मराठी चित्रपटांमध्ये सध्या प्रमोशन व ट्रेलर बरेच काम केले जाते हे ही येथे अधोरेखित होते.

किरण नाटकी