Wednesday 19 November 2014

एलिजाबेथ एकादशी - चित्रपट समीक्षा

लहान मुलांवर आधारित मराठी चित्रपटाचा ''श्वास''पासून सुरु झालेला प्रवास टिंग्या, फंड्री व टपाल, ते आता ''एलिजाबेथ एकादशी'' पर्यन्त येऊन पोहचलाय.

एक चांगली कथा, एक प्रतिभावंत दिग्दर्शक व त्याला कलाकारांच्या उत्तम अभिनयाची साथ मिळाली की ''एलिजाबेथ एकादशी''चा योग येतो. मुळात या चित्रपटामध्ये कुठलाही प्रसिद्ध कलाकार नाही पण सर्वच बाल कलाकारांनी अगदी धमाल केली आहे. त्याला सर्वच कलाकारांनी मोलाची साथ दिली आहे. ''एलिजाबेथ एकादशी''ची वन-लाइन स्टोरी खुप गंभीर अाहे पण ती कथा परेश मोकाशी यांनी खूपच मनोरंजक पद्धतीने सादर केल्यामुळे चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही. एका क्षणाला हसवणारा व दुसऱ्याच क्षणाला अन्तर्मुख करायला लावणारा असा एलिजाबेथ एकादशी आहे. वैज्ञानिक न्यूटन काय न्हणतात? ते तुम्हाला माहित असेलच पण संत न्यूटन काय न्हणतात? ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला ''एलिजाबेथ एकादशी'' बघावा लागेल.  

पंढरपूरच्या वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरमध्ये राहणाऱ्या ''ज्ञानेश'' या मुलाची, त्याच्या कुटुंबाची, त्याच्या ''एलिजाबेथ'' या त्याच्या सायकलवर असलेल्या त्याच्या प्रेमाची व त्याच्यापोटी त्यांने केलेल्या संघर्षाची ही गोष्ट आहे. या चित्रपटातील पात्र तुम्ही तुमच्या आजुबाजूला पण बघु शकता. काही प्रसंगात तुमचे लहानपण किवा तुमच्या मुलांचे लहानपण तुम्हाला आठवण्याची शक्यता आहे.
  
हा पूर्णपणे दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. अगदी कला दिग्दर्शनापासून ते छायाचित्रण सगळ्याच बाबीत चित्रपट सरस झाला आहे. या चित्रपटात एकच गाणे आहे ते चित्रपटाच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत आपली सोबत करते, पण पूर्ण चित्रपटांमध्ये पार्श्वसंगीताचाही महत्वाचा वाटा आहे. चित्रपटाचा कालावधी फक्त १ तास व ३० मिनट असणे हे पण ''एलिजाबेथ एकादशी''चे बळस्थान आहे.   

चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत गुंतवून ठेवणारा ''एलिजाबेथ एकादशी'', मराठी येणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून बघायला हवा …

2 comments:

  1. I read entire article and its quite impressive. selection of words is good.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks for your kind words !!!! Its really feel nice !!!!

      Delete

किरण नाटकी