Thursday 25 December 2014

२०१४ ची मराठी चित्रपट सृष्टि

२०१४ वर्ष मराठी चित्रपट सृष्टिसाठी अतिशय आशादायक व प्रयोगशील वर्ष राहिले. या वर्षी मराठी चित्रपटांमध्ये अनेक नवे प्रयोग झाले, अनेक चित्रपटांनी टिकिट खिडकीवर चांगली कमाई केली, नविन दमाच्या दिग्दर्शक, निर्माते, कलाकार यांनी मराठीत पदार्पण केले, हिंदी चित्रपट कलाकारांचा मराठीत वावर वाढला. या वर्षी अनेक मराठी चित्रपटांना राष्ट्रीय व अंतर राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये  पुरस्कार प्राप्त झाले.

महिला दिग्दर्शक व निर्मात्या यांचा वाढता वावर हे ही या वर्षीच्या मराठी चित्रपटांचे वैशिष्ट्य आहे.  

या वर्षी जनवरी महिन्यात प्रदर्शित झालेल्या ''टाइमपास''ने मराठी चित्रपटाची यशस्वी सुरवात केली. रवी जाधव यांनी नटरंग, बालगन्धर्व, बालक पालक नंतर टाइमपासच्या निमित्ताने हिट चित्रपटांचा चौकार मारला. टाइमपास चा ''नया है वह'' या संवादाने अगदी धमाल उडवून दिली.   

फरवरी महिन्यात प्रदर्शित झालेल्या ''फंड्री''ने समीक्षक व प्रेक्षक दोघांना भारावून सोडले. नागराज मंजुळे या नवीन दमाच्या दिग्दर्शकाने पहिल्याच चित्रपटात सर्वांना आपल्या दिग्दर्शकीय कौशल्याने चकित केले.  

मार्च मध्ये ३ राष्ट्रीय पुरस्कार विजेता, शिवाजी लोटन पाटिल दिग्दर्शित ''धग'' प्रदर्शित झाला.

अप्रिल मध्ये हिंदी चित्रपटांमधील यशस्वी छायाचित्रकार महेश लिमये दिग्दर्शित ''येलो'' प्रदर्शित झाला. या चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला.   

मे महिन्यामध्ये चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ''दूसरी गोष्ट'' हा राजकीयपट प्रदर्शित झाला. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ''एक हजाराची नोट'' या चित्रपटाने अनेक पुरस्कार प्राप्त केले. याच महिन्यात ''शाळा'' फेम सुजय डहाके यांचा उर्मिला मार्तोंडकर दिग्दर्शित ''आजोबा'' हा बहु-प्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अयशस्वी ठरला.   

जुलाई महिन्यात रीतेश देशमुख अभिनीत व निशिकांत कामत दिग्दर्शित ''लय भारी'' प्रदर्शित झाला. पहिल्यांदाच रीतेश देशमुख यांची मराठी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका, निशिकांत कामत यांचे दिग्दर्शन व अजय अतुल यांचे संगीत यामुळे ''लय भारी'' यशस्वी ठरला.

ऑगस्ट महिन्यात अस्तु, पोस्टर बॉयज़, रमा माधव, रेगे असे वेग वेगळया विषयावरचे लक्षवेधी चित्रपट प्रदर्शित झाले. रवि जाधव प्रस्तुत व  अभिजीत पानसे दिग्दर्शित ''रेगे'' या चित्रपटाने वेगळा विषय व ट्रिटमेंटमुळे अतिशय चांगली कमाई केली.

सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झालेले नटी, बावरे प्रेम हे व टपाल हे त्यांच्या वेगळ्या विषयांमुळे चर्चेत राहिले.

ऑक्टोबर महिन्यात सचिन पिळगावकर व सतीश राजवाडे या जोडीचा ''सांगतो ऐका'' प्रदर्शित झाला. याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या ''डॉ प्रकाश बाबा आमटे'' या समृद्धि पोरे दिग्दर्शित चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टि मध्ये नवा इतिहास घडवला. डॉ प्रकाश बाबा आमटे यांची सत्यकथा, नाना पाटेकर व सोनाली कुलकर्णी यांचा अभिनय यामुळे हा चित्रपट सुपर हिट ठरला. ''गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा'' विनोदी राजकीयपटाचा सीक्वल ''पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा'' नावाने प्रदर्शित झाला.    

दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या संजय जाधव दिग्दर्शित ''प्यार वाली लव स्टोरी'' सुद्धा या वर्षी यशस्वी चित्रपटांमध्ये मध्ये आपले स्थान बनवू शकला.

नवंबर महिन्यात प्रदर्शित झालेले परेश मोकाशी यांचा ''एलिज़ाबेथ एकादशी'', सचिन कुंडलकर यांचा ''हैप्पी जर्नी'', गजेन्द्र अहिरे यांचा ''स्वामी पब्लिक लिमिटेड'', विषय व दिग्दर्शनामुळे चर्चेत राहिले. 

दिसम्बर महिन्यात मध्यमवर्ग, प्रेमासाठी कमिंग सून, मिस मैच प्रदर्शित झाले. 

''अवताराची गोष्ट'' आणि ''आय पी एल''

उद्या दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे, ''अवताराची गोष्ट'' आणि ''आय पी एल''.

पहिला चित्रपट न्हणजे ''अवताराची गोष्ट'', नितिन दिक्षित दिग्दर्शित या चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे यांची प्रमुख भूमिका आहे. ''स्वताच्या अवतारकार्याची शोधयात्रा'' अशी टैगलाइन या चित्रपटाला देण्यात आली आहे. या चित्रपटाच्या एका पोस्टरमध्ये अनेक महापुरुषांचे फोटो दिसत आहेत, बहुधा पहिल्यांदाच अशाप्रकारे महापुरुष मराठी चित्रपटाच्या पोस्टर्स मध्ये अवतरीत झाले असावे.

येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणारा दूसरा चित्रपट ''आय पी एल'' हा आहे , इथे ''आय पी एल'' चा अर्थ '' इंडियन प्रेमाचा लफड़ा '' अशा आहे. दिपक कदम दिग्दर्शित या चित्रपटामध्ये स्वप्निल जोशी, संतोष मयेकर, विजय पाटकर व विजय कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  

Monday 22 December 2014

''पीके''

आमिर खान बहु-प्रतीक्षित ''पीके'' हा चित्रपट ह्या शुक्रवारी प्रदर्शित झाल्यामुळे एकहि मराठी चित्रपट प्रदर्शित झाला नाही,  मागच्या शुक्रवारी ४ मराठी चित्रपट प्रदर्शित झाले होते.   

चेन्नई एक्सप्रेस आणि दुनियादारीसाठी झालेला संघर्ष वगळता हिंदी व मराठी चित्रपटातील चुरस टिकिट खिडकीवर फारशी पाहायला मिळत नाही. 

Saturday 13 December 2014

''मध्यमवर्ग'', ''मिस मैच'', ''लव फैक्टर'' आणि ''प्रेमासाठी कमिंग सून''

ह्या शुक्रवारी तब्बल चार मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत, ''मध्यमवर्ग'', ''मिस मैच'', ''लव फैक्टर'' आणि ''प्रेमासाठी कमिंग सून''. ह्या आठवड्यात हिंदित कुठलाही मोठा चित्रपट प्रदर्शित झाला नाही त्यामुळे निर्मात्यांनी ही रिस्क घेतली असावी. पण ह्यामुळे मुळातच कमी असलेला मराठी चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग विभागाला जाऊन पर्यायाने चित्रपटाचे नुकसान होते.  

काल प्रदर्शित झालेल्या ''मध्यमवर्ग''मध्ये सिद्धार्थ जाधव व रवि किशन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने भोजपुरी सुपरस्टार रवि किशन पहिल्यांदाच मराठीत पदार्पण करीत आहे. हा चित्रपट सामाजिक ड्रामा आहे. काल प्रदर्शित झालेले बाकी तीन चित्रपट ''मिस मैच'', ''लव फैक्टर'' आणि ''प्रेमासाठी कमिंग सून'' हे प्रेमकथा आहेत. विनोदी चित्रपटांची लाट ओसरल्यानंतर सध्या मराठीत  सध्या प्रेमकथांचे नवीन पर्व सुरु आहे. 

Sunday 7 December 2014

''रीमिक्स'' टाईटल्सचा जमाना

सध्या मराठी चित्रपटांच्या नावांमध्ये इंग्लिश आणि हिंदी वापरण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. ह्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला चित्रपट ''कैंडल मार्च'' असो किंवा मागील काही महिन्यात प्रदर्शित झालेले ''हैप्पी जर्नी'', ''पोस्टर बॉयज़'', ''येलो'', ''टाइम पास'' असो. इंग्लिश टाईटल्सची सध्या मराठी मध्ये चलती आहे, हेच न्हणावे लागेल. इंग्लिश टाईटल्सच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये ''मिस मैच'', ''लव फैक्टर'', ''आई पि एल'', ''क्लासमेट्स''चे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.

इंग्लिश आणि हिंदी सोबतच एक नवा प्रकार उदयास आला आहे, तो न्हणजे रीमिक्स टाईटल्सचा. मराठी, हिंदी आणि इंग्लिश पैकी कोणत्याही दोन भाषा वापरून तयार केलेल्या टाईटल्सला आपण रीमिक्स टाईटल न्हणु शकतो. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या रीमिक्स टाईटल्स मराठी चित्रपटांमध्ये ''स्वामी पब्लिक लिमिटेड'', ''एलिज़ाबेथ एकादशी'', ''बोल बेबी बोल'', ''प्यारवाली लव स्टोरी'', ''इश्क़ वाला लव'', ''पुणे वाया बिहार'' नाव घेता येईल. अश्या रीमिक्स टाईटल्सच्या येणाऱ्या मराठी चित्रपटामध्ये ''प्रेमासाठी कमिंग सून'', ''७ रोशन विला'', ''बाइकर्स अड्डा''चे नाव प्रामुख्याने घेता येईल.

Friday 5 December 2014

कैंडल मार्च

आज सचिन देव दिग्दर्शित ''कैंडल मार्च'' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झालाय. या चित्रपटामध्ये तेजस्विनी पंडित, मनवा नाईक, स्मिता ताम्बे व सायली सह्त्रबुद्धे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सोबतच चित्रपटाच्या सुरुवातीला निवेदक न्हणुन नाना पाटेकर यांचा आवाज या चित्रपटात वापरण्यात आला आहे. सध्या समाजात महिलावर होणाऱ्या बलात्कार व अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत, हाच ज्वलंत विषय या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.

किरण नाटकी