Thursday 25 December 2014

२०१४ ची मराठी चित्रपट सृष्टि

२०१४ वर्ष मराठी चित्रपट सृष्टिसाठी अतिशय आशादायक व प्रयोगशील वर्ष राहिले. या वर्षी मराठी चित्रपटांमध्ये अनेक नवे प्रयोग झाले, अनेक चित्रपटांनी टिकिट खिडकीवर चांगली कमाई केली, नविन दमाच्या दिग्दर्शक, निर्माते, कलाकार यांनी मराठीत पदार्पण केले, हिंदी चित्रपट कलाकारांचा मराठीत वावर वाढला. या वर्षी अनेक मराठी चित्रपटांना राष्ट्रीय व अंतर राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये  पुरस्कार प्राप्त झाले.

महिला दिग्दर्शक व निर्मात्या यांचा वाढता वावर हे ही या वर्षीच्या मराठी चित्रपटांचे वैशिष्ट्य आहे.  

या वर्षी जनवरी महिन्यात प्रदर्शित झालेल्या ''टाइमपास''ने मराठी चित्रपटाची यशस्वी सुरवात केली. रवी जाधव यांनी नटरंग, बालगन्धर्व, बालक पालक नंतर टाइमपासच्या निमित्ताने हिट चित्रपटांचा चौकार मारला. टाइमपास चा ''नया है वह'' या संवादाने अगदी धमाल उडवून दिली.   

फरवरी महिन्यात प्रदर्शित झालेल्या ''फंड्री''ने समीक्षक व प्रेक्षक दोघांना भारावून सोडले. नागराज मंजुळे या नवीन दमाच्या दिग्दर्शकाने पहिल्याच चित्रपटात सर्वांना आपल्या दिग्दर्शकीय कौशल्याने चकित केले.  

मार्च मध्ये ३ राष्ट्रीय पुरस्कार विजेता, शिवाजी लोटन पाटिल दिग्दर्शित ''धग'' प्रदर्शित झाला.

अप्रिल मध्ये हिंदी चित्रपटांमधील यशस्वी छायाचित्रकार महेश लिमये दिग्दर्शित ''येलो'' प्रदर्शित झाला. या चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला.   

मे महिन्यामध्ये चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ''दूसरी गोष्ट'' हा राजकीयपट प्रदर्शित झाला. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ''एक हजाराची नोट'' या चित्रपटाने अनेक पुरस्कार प्राप्त केले. याच महिन्यात ''शाळा'' फेम सुजय डहाके यांचा उर्मिला मार्तोंडकर दिग्दर्शित ''आजोबा'' हा बहु-प्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अयशस्वी ठरला.   

जुलाई महिन्यात रीतेश देशमुख अभिनीत व निशिकांत कामत दिग्दर्शित ''लय भारी'' प्रदर्शित झाला. पहिल्यांदाच रीतेश देशमुख यांची मराठी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका, निशिकांत कामत यांचे दिग्दर्शन व अजय अतुल यांचे संगीत यामुळे ''लय भारी'' यशस्वी ठरला.

ऑगस्ट महिन्यात अस्तु, पोस्टर बॉयज़, रमा माधव, रेगे असे वेग वेगळया विषयावरचे लक्षवेधी चित्रपट प्रदर्शित झाले. रवि जाधव प्रस्तुत व  अभिजीत पानसे दिग्दर्शित ''रेगे'' या चित्रपटाने वेगळा विषय व ट्रिटमेंटमुळे अतिशय चांगली कमाई केली.

सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झालेले नटी, बावरे प्रेम हे व टपाल हे त्यांच्या वेगळ्या विषयांमुळे चर्चेत राहिले.

ऑक्टोबर महिन्यात सचिन पिळगावकर व सतीश राजवाडे या जोडीचा ''सांगतो ऐका'' प्रदर्शित झाला. याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या ''डॉ प्रकाश बाबा आमटे'' या समृद्धि पोरे दिग्दर्शित चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टि मध्ये नवा इतिहास घडवला. डॉ प्रकाश बाबा आमटे यांची सत्यकथा, नाना पाटेकर व सोनाली कुलकर्णी यांचा अभिनय यामुळे हा चित्रपट सुपर हिट ठरला. ''गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा'' विनोदी राजकीयपटाचा सीक्वल ''पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा'' नावाने प्रदर्शित झाला.    

दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या संजय जाधव दिग्दर्शित ''प्यार वाली लव स्टोरी'' सुद्धा या वर्षी यशस्वी चित्रपटांमध्ये मध्ये आपले स्थान बनवू शकला.

नवंबर महिन्यात प्रदर्शित झालेले परेश मोकाशी यांचा ''एलिज़ाबेथ एकादशी'', सचिन कुंडलकर यांचा ''हैप्पी जर्नी'', गजेन्द्र अहिरे यांचा ''स्वामी पब्लिक लिमिटेड'', विषय व दिग्दर्शनामुळे चर्चेत राहिले. 

दिसम्बर महिन्यात मध्यमवर्ग, प्रेमासाठी कमिंग सून, मिस मैच प्रदर्शित झाले. 

''अवताराची गोष्ट'' आणि ''आय पी एल''

उद्या दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे, ''अवताराची गोष्ट'' आणि ''आय पी एल''.

पहिला चित्रपट न्हणजे ''अवताराची गोष्ट'', नितिन दिक्षित दिग्दर्शित या चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे यांची प्रमुख भूमिका आहे. ''स्वताच्या अवतारकार्याची शोधयात्रा'' अशी टैगलाइन या चित्रपटाला देण्यात आली आहे. या चित्रपटाच्या एका पोस्टरमध्ये अनेक महापुरुषांचे फोटो दिसत आहेत, बहुधा पहिल्यांदाच अशाप्रकारे महापुरुष मराठी चित्रपटाच्या पोस्टर्स मध्ये अवतरीत झाले असावे.

येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणारा दूसरा चित्रपट ''आय पी एल'' हा आहे , इथे ''आय पी एल'' चा अर्थ '' इंडियन प्रेमाचा लफड़ा '' अशा आहे. दिपक कदम दिग्दर्शित या चित्रपटामध्ये स्वप्निल जोशी, संतोष मयेकर, विजय पाटकर व विजय कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  

Monday 22 December 2014

''पीके''

आमिर खान बहु-प्रतीक्षित ''पीके'' हा चित्रपट ह्या शुक्रवारी प्रदर्शित झाल्यामुळे एकहि मराठी चित्रपट प्रदर्शित झाला नाही,  मागच्या शुक्रवारी ४ मराठी चित्रपट प्रदर्शित झाले होते.   

चेन्नई एक्सप्रेस आणि दुनियादारीसाठी झालेला संघर्ष वगळता हिंदी व मराठी चित्रपटातील चुरस टिकिट खिडकीवर फारशी पाहायला मिळत नाही. 

Saturday 13 December 2014

''मध्यमवर्ग'', ''मिस मैच'', ''लव फैक्टर'' आणि ''प्रेमासाठी कमिंग सून''

ह्या शुक्रवारी तब्बल चार मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत, ''मध्यमवर्ग'', ''मिस मैच'', ''लव फैक्टर'' आणि ''प्रेमासाठी कमिंग सून''. ह्या आठवड्यात हिंदित कुठलाही मोठा चित्रपट प्रदर्शित झाला नाही त्यामुळे निर्मात्यांनी ही रिस्क घेतली असावी. पण ह्यामुळे मुळातच कमी असलेला मराठी चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग विभागाला जाऊन पर्यायाने चित्रपटाचे नुकसान होते.  

काल प्रदर्शित झालेल्या ''मध्यमवर्ग''मध्ये सिद्धार्थ जाधव व रवि किशन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने भोजपुरी सुपरस्टार रवि किशन पहिल्यांदाच मराठीत पदार्पण करीत आहे. हा चित्रपट सामाजिक ड्रामा आहे. काल प्रदर्शित झालेले बाकी तीन चित्रपट ''मिस मैच'', ''लव फैक्टर'' आणि ''प्रेमासाठी कमिंग सून'' हे प्रेमकथा आहेत. विनोदी चित्रपटांची लाट ओसरल्यानंतर सध्या मराठीत  सध्या प्रेमकथांचे नवीन पर्व सुरु आहे. 

Sunday 7 December 2014

''रीमिक्स'' टाईटल्सचा जमाना

सध्या मराठी चित्रपटांच्या नावांमध्ये इंग्लिश आणि हिंदी वापरण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. ह्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला चित्रपट ''कैंडल मार्च'' असो किंवा मागील काही महिन्यात प्रदर्शित झालेले ''हैप्पी जर्नी'', ''पोस्टर बॉयज़'', ''येलो'', ''टाइम पास'' असो. इंग्लिश टाईटल्सची सध्या मराठी मध्ये चलती आहे, हेच न्हणावे लागेल. इंग्लिश टाईटल्सच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये ''मिस मैच'', ''लव फैक्टर'', ''आई पि एल'', ''क्लासमेट्स''चे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.

इंग्लिश आणि हिंदी सोबतच एक नवा प्रकार उदयास आला आहे, तो न्हणजे रीमिक्स टाईटल्सचा. मराठी, हिंदी आणि इंग्लिश पैकी कोणत्याही दोन भाषा वापरून तयार केलेल्या टाईटल्सला आपण रीमिक्स टाईटल न्हणु शकतो. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या रीमिक्स टाईटल्स मराठी चित्रपटांमध्ये ''स्वामी पब्लिक लिमिटेड'', ''एलिज़ाबेथ एकादशी'', ''बोल बेबी बोल'', ''प्यारवाली लव स्टोरी'', ''इश्क़ वाला लव'', ''पुणे वाया बिहार'' नाव घेता येईल. अश्या रीमिक्स टाईटल्सच्या येणाऱ्या मराठी चित्रपटामध्ये ''प्रेमासाठी कमिंग सून'', ''७ रोशन विला'', ''बाइकर्स अड्डा''चे नाव प्रामुख्याने घेता येईल.

Friday 5 December 2014

कैंडल मार्च

आज सचिन देव दिग्दर्शित ''कैंडल मार्च'' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झालाय. या चित्रपटामध्ये तेजस्विनी पंडित, मनवा नाईक, स्मिता ताम्बे व सायली सह्त्रबुद्धे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सोबतच चित्रपटाच्या सुरुवातीला निवेदक न्हणुन नाना पाटेकर यांचा आवाज या चित्रपटात वापरण्यात आला आहे. सध्या समाजात महिलावर होणाऱ्या बलात्कार व अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत, हाच ज्वलंत विषय या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.

Saturday 29 November 2014

''प्रकाशवाटा'' ते ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो''

मी आज ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' बघितला, हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्याची इच्छा होती पण एकूण कामाचा व्याप बघता ते आज शक्य झाले. आज चित्रपट प्रदर्शित होऊन ५१ दिवसानंतरही हा चित्रपट बघण्यासाठी बऱ्यापैकी गर्दी होती. ८व्या आठवड्यातही हा चित्रपट गर्दी खेचतोय हेच ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो''चे व मराठी चित्रपटाचे मोठे यश आहे.

जवळपास तीन वर्षापुर्वी ''मी सिंधुताई सपकाळ'' बघितला होता, हा चित्रपट सिंधुताई सपकाळ यांच्या ''मी वनवासी'' या आत्मचरित्रावर आधारित होता. आत्मचरित्रावर आधारित हा एक उत्तम चित्रपट आहे. ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' याच परंपरेतला चित्रपट आहे. 

या वर्षाच्या सुरुवातीला मी डॉ प्रकाश आमटे यांचे आत्मकथन ''प्रकाशवाटा'' वाचले होते, त्यात त्यांनी वर्णन केलेले हेमलकसा मधील सुरुवातीचे दिवस, त्यांना आलेल्या अडचणी, अनुभव सगळेच अंगावर काटा आणणारे होते. हे पुस्तक वाचल्यावर तुम्ही संवेदनशील झाल्याशिवाय राहत नाही. कमी अधिक प्रमाणात हाच अनुभव ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' बघून येतो.

डॉ प्रकाश बाबा आमटे यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत मिळून हेमलकसा येथे जंगलात शून्यातून विश्व उभारले. विविध समस्यांना तोंड देत, तेथील आदिवासी समाजाला प्रतिकूल परिस्थितीत आयोग्यसेवा उपलब्ध करून दिली. तेवढ्यावरच न थांबता तिथे शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देत, तेथील आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ते करीत आहेत.

एक चित्रपट न्हणुन ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' मध्ये काही उणिवा असल्या तरी या चित्रपटाची कथा थेट मनाला भिडणारी आहे. विश्वास वाटायला कठीण अशी ही सत्यकथा आहे. नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, मोहन आगाशे यांच्या सोबतच सर्व सहकलाकारांचा अभिनय अगदी प्रभवशाली आहे. वास्तविक लोकेशन्सवर चित्रपट चित्रित झाल्यामुळे चित्रपटाचा प्रभाव वाढवण्यास मदत झाली आहे. चित्रपट बघताना प्रेक्षक हरवून जातातच पण चित्रपट संपल्यावर येणारे आमटे कुटुंबिय व कार्यकर्ते यांचे फोटोज बघण्यासाठी पण थांबतात, यासाठी आपण खास करून समृद्धि पोरे यांचे अभिनन्दन करायला हवे ज्यांनी हे प्रेरणादायी कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यास मदत केली आहे.

या चित्रपटात बऱ्याच वैद्यरभीय व नागपूरच्या कलाकारांनी अभिनय केला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून विदर्भात चित्रीकरण झालेल्या चित्रपटात आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे.

''प्रकाशवाटा'' ते ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' मधील मुख्य प्रेरणा आहे, बदल. ज्या प्रकारे डॉ प्रकाश बाबा आमटे यांनी गडचिरोलीच्या आदिवासी समाजात सकारात्मक बदल घडून आणला आहे. त्याच प्रकारे आपण स्वत मध्ये व आपल्या समाजात काय सकारात्मक बदल घडून आणतो हेच महत्वाचे आहे. 

Friday 28 November 2014

''स्वामी पब्लिक लिमिटेड'' आणि ''हैप्पी जर्नी''

आज मराठीतील दोन दिग्गज दिग्दर्शकांचे चित्रपट प्रदर्शित झालेत,  गजेन्द्र अहिरे यांचा ''स्वामी पब्लिक लिमिटेड'' व सचिन कुंडलकर यांचा ''हैप्पी जर्नी''. 

आज प्रदर्शित झालेला गजेन्द्र अहिरे यांचा ''स्वामी पब्लिक लिमिटेड'' श्रद्धेचा बाजार या विषयावर आधारित आहे. ''स्वामी पब्लिक लिमिटेड''च्या माध्यमातून विक्रम गोखले, विनय आपटे, सुबोध भावे व चिन्मय मंडलेकर या जुन्या व नव्या कसदार अभिनेत्यांचा अभिनय बघायला मिळणार आहे.      

''अय्या'' मधून हिंदित पदार्पण केल्यानंतर सचिन कुंडलकर पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे त्यांचा नविन सिनेमा ''हैप्पी जर्नी'' घेऊन. या चित्रपटामध्ये अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, पल्लवी सुभाष यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Friday 21 November 2014

''विटी दांडू'' आणि ''मामाच्या गावाला जाऊया''

आज दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत ''विटी दांडू'' आणि ''मामाच्या गावाला जाऊया''.

''विटी दांडू'' ही स्वत्रंतपूर्व काळातील नातू व आजोबा यांच्या नाते सम्बन्धावर आधारित गोष्ट असून या चित्रपटात आजोबाची भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी साकारली आहे. गणेश कदम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले अाहे. अजय देवगण फिल्म्स या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करीत आहे.

आज प्रदर्शित झालेला दूसरा चित्रपट ''मामाच्या गावाला जाऊया'' हा पूर्णपणे जंगलात निर्मित पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर हेमंत जोशी यांनी केलेले आहे. मामाच्या गावाला जाणे याचा अर्थ धमाल, मौजमजा असा असतो त्यामुळे ''मामाच्या गावाला जाऊया'' हे शीर्षक नक्कीच प्रेक्षकांना आकर्षित करेल अशी अपेक्षा करुया.

''डॉ प्रकाश बाबा आमटे'' या चित्रपटाला सहाव्या आठवड्यात ही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय व मागच्या आठवड्यात प्रदर्शित ''एलिजाबेथ एकादशी''ला ही प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे त्यामुळे या चित्रपटाशी आज प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना स्पर्धा करावी लागणार आहे. पुढील आठवड्यात ''स्वामी पब्लिक लिमिटेड'' व  ''हैप्पी जर्नी'' हे दोन  बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होत आहेत.    

Wednesday 19 November 2014

एलिजाबेथ एकादशी - चित्रपट समीक्षा

लहान मुलांवर आधारित मराठी चित्रपटाचा ''श्वास''पासून सुरु झालेला प्रवास टिंग्या, फंड्री व टपाल, ते आता ''एलिजाबेथ एकादशी'' पर्यन्त येऊन पोहचलाय.

एक चांगली कथा, एक प्रतिभावंत दिग्दर्शक व त्याला कलाकारांच्या उत्तम अभिनयाची साथ मिळाली की ''एलिजाबेथ एकादशी''चा योग येतो. मुळात या चित्रपटामध्ये कुठलाही प्रसिद्ध कलाकार नाही पण सर्वच बाल कलाकारांनी अगदी धमाल केली आहे. त्याला सर्वच कलाकारांनी मोलाची साथ दिली आहे. ''एलिजाबेथ एकादशी''ची वन-लाइन स्टोरी खुप गंभीर अाहे पण ती कथा परेश मोकाशी यांनी खूपच मनोरंजक पद्धतीने सादर केल्यामुळे चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही. एका क्षणाला हसवणारा व दुसऱ्याच क्षणाला अन्तर्मुख करायला लावणारा असा एलिजाबेथ एकादशी आहे. वैज्ञानिक न्यूटन काय न्हणतात? ते तुम्हाला माहित असेलच पण संत न्यूटन काय न्हणतात? ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला ''एलिजाबेथ एकादशी'' बघावा लागेल.  

पंढरपूरच्या वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरमध्ये राहणाऱ्या ''ज्ञानेश'' या मुलाची, त्याच्या कुटुंबाची, त्याच्या ''एलिजाबेथ'' या त्याच्या सायकलवर असलेल्या त्याच्या प्रेमाची व त्याच्यापोटी त्यांने केलेल्या संघर्षाची ही गोष्ट आहे. या चित्रपटातील पात्र तुम्ही तुमच्या आजुबाजूला पण बघु शकता. काही प्रसंगात तुमचे लहानपण किवा तुमच्या मुलांचे लहानपण तुम्हाला आठवण्याची शक्यता आहे.
  
हा पूर्णपणे दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. अगदी कला दिग्दर्शनापासून ते छायाचित्रण सगळ्याच बाबीत चित्रपट सरस झाला आहे. या चित्रपटात एकच गाणे आहे ते चित्रपटाच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत आपली सोबत करते, पण पूर्ण चित्रपटांमध्ये पार्श्वसंगीताचाही महत्वाचा वाटा आहे. चित्रपटाचा कालावधी फक्त १ तास व ३० मिनट असणे हे पण ''एलिजाबेथ एकादशी''चे बळस्थान आहे.   

चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत गुंतवून ठेवणारा ''एलिजाबेथ एकादशी'', मराठी येणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून बघायला हवा …

Sunday 9 November 2014

एलिज़ाबेथ एकादशी

''हरीचंद्राची फैक्टरी''नंतर आता परेश मोकाशी ''एलिज़ाबेथ एकादशी'' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांचा हा नवीन मराठी चित्रपट येत्या शुक्रवारी १४ नवंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी खुप उत्सुकता दिसून येत आहे. फेसबुकवर या चित्रपटाच्या पेजला एका महिन्यातच जवळपास २५ हजार लाइक्स मिळालेले आहेत. या पेजच्या माध्यमातून अतिशय कल्पकपणे या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आहे. 

एलिज़ाबेथ व एकादशी या एकमेकांशी कुठल्याही प्रकारे सम्बन्ध नसलेल्या शब्दांना जोडून या चित्रपटाला ''एलिज़ाबेथ एकादशी'' असे नाव ठेवण्यात आलेले आहे. या चित्रपटाची कथा पंढरपुरमध्ये राहणाऱ्या मुलावर आधारित आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सायकलचा अतिशय सुंदरपणे वापर करण्यात आलेला आहे. कदाचित या चित्रपटामध्ये एलिज़ाबेथ हे ह्या सायकलचे नाव असावे. नक्की काय ते तर येत्या शुक्रवारीच कळणार आहे.

Saturday 8 November 2014

स्वामी पब्लिक लिमिटेडच्या निमित्ताने

गजेन्द्र अहिरे यांचा नवीन चित्रपट ''स्वामी पब्लिक लिमिटेड'' येत्या २८ नवंबरला प्रदर्शित होतोय. मागील एका दशकापासून सातत्याने वेगवेगळ्या विषयावर दर्जेदार चित्रपटाची मेजवानी प्रेक्षकांना देणाऱ्या गजेन्द्र अहिरे यांचा हा नवीन चित्रपट ''श्रद्धेचा बाजार'' या विषयवार आधारित आहे. ''स्वामी पब्लिक लिमिटेड''च्या माध्यमातून विक्रम गोखले, विनय आपटे, सुबोध भावे व चिन्मय मंडलेकर या जुन्या व नव्या कसदार अभिनेत्यांचा अभिनय बघायला मिळणार आहे.        

गजेन्द्र अहिरे यांनी त्यांच्या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग केले आहेत, सोबतच समाजातील विविध समस्यांचा विचार करून त्यांना मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांच्या समोर आणले आहे. उदाहरणार्थ त्यांनी ''त्या रात्री पाऊस होता'' व ''पारध''च्या माध्यमातून राजकारणावर भाष्य केले आहे. ''पिपानी'' च्या माध्यमातून त्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या उपरोधक पद्धतीने मांडल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात त्यांनी कुठल्यातरी सामाजिक समस्येचा उहापोह केलेला दिसतो. 

या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी ''नितिन देसाई'' व ''चंद्रकांत कुलकर्णी'' यांच्यासारख्या दिग्दर्शकांना सुद्धा दिग्दर्शित केले आहे. अलीकडे त्यांनी मकरंद अनासपुरे यांना पारध, सुंभराण, पिपाणी आणि अनवटच्या माध्यमातून वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांपुढे आणले आहे. गजेन्द्र अहिरे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.  

Friday 7 November 2014

''बोल बेबी बोल'' आणि ''गोष्ट तिच्या प्रेमाची''

आज ''बोल बेबी बोल'' आणि ''गोष्ट तिच्या प्रेमाची'' हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत.

स्व. विनय लाड दिग्दर्शित ''बोल बेबी बोल'' विनोदी चित्रपट असून यामध्ये मकरंद अनासपुरे, अनिकेत विश्वासराव व नेहा पेंडसे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सोबतच अरुणा ईरानी या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

आज प्रदर्शित झालेला दूसरा चित्रपट नरेंद्र ठाकुर दिग्दर्शित ''गोष्ट तिच्या प्रेमाची'' हि प्रेमकथा आहे.    .  

Thursday 6 November 2014

क्लासमेट्स

उलाढाल, सतरंगी रे आणि नारबाची वाड़ी नंतर नव्या पिढीतील मराठी दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा ''क्लासमेट्स'' हा नवीन मराठी चित्रपट पुढील वर्षी १६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, सचित पाटिल, सुशांत शेलार व सिद्धार्थ चांदेकर अशी तगड़ी स्टारकास्ट असणारा हा सिनेमा कॉलेज मधील विद्यार्थांची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे व त्याला विद्यार्थी संघटनांमधील राजकारणाची जोड आहे असे ट्रेलर मधून दिसते. 

या चित्रपटाचा ट्रेलर सध्या यूटुबवर गाजतोय. विविध रंगाच्या अक्षरांच्या रुपात असलेल्या ''क्लासमेट्स''च्या टाइटल प्रमाणे त्यांच्या ट्रेलर मध्ये ही रंगाची उधळण केली आहे जी नक्कीच डोळ्यांना सुखावणारी आहे. ''क्लासमेट्स'' त्यांच्या ट्रेलर मधून चित्रपटाविषयी उत्सुकता जागवतो, सोबतच मराठी चित्रपटांमध्ये सध्या प्रमोशन व ट्रेलर बरेच काम केले जाते हे ही येथे अधोरेखित होते.

Friday 31 October 2014

''चिंतामणी'' आणि ''आशियाना''

आज दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत ''चिंतामणी'' आणि ''आशियाना''.

संगीता बालचंद्रन दिग्दर्शित ''चिंतामणी'' मधून भरत जाधव व अमृता सुभाष यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पद्यावर येत आहे. भरत जाधव यांच्यामुळे या चित्रपटाला चांगला प्रतिसाद भेटू शकतो. सध्या भरत जाधव यांनी विनोदी चित्रपटांसोबतच वेगवेगळया विषयावरच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

आज प्रदर्शित झालेला दूसरा चित्रपट ''आशियाना'' हा बार डांसर्सच्या जीवनावर आधारित आहे असे एकंदरित चित्रपटाच्या पोस्टर्स वरुन दिसतेय. अजीत देवळे दिग्दर्शित या चित्रपटातून तीन नवीन अभिनेत्री मराठी चित्रपट शृष्टीत पदार्पण करणार आहेत, हे ह्या चित्रपटाचे वैशिष्ट्ये न्हणता येईल.         

Wednesday 15 October 2014

प्यारवाली लवस्टोरी की दुनियादारी २ ?

संजय जाधव यांचा ''प्यारवाली लवस्टोरी'' येत्या २४ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय. ''दुनियादारी''च्या हाऊसफूल यशानंतर त्यांचा हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे ''प्यारवाली लवस्टोरी'' बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. ''प्यारवाली लवस्टोरी'' चे प्रमोशन सुद्धा खुप धडाक्यात सुरु आहे.

''दुनियादारी'' आणि ''प्यारवाली लवस्टोरी''च्या कलाकारांमध्ये बरेच कलाकार तेच असल्यामुळे ''प्यारवाली लवस्टोरी'' की ''दुनियादारी २'' हा प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडतोय. आता तोच प्रश्न माझ्या मित्राने मला विचारल्यामुळे हा लेख. या चित्रपटाचा ट्रेलर पहिल्यानंतर मलाही हाच प्रश्न पडला होता कारण ट्रेलर मधून ''प्यारवाली लवस्टोरी'' ही एक प्रेमत्रिकोण असलेली प्रेमकथा आहे असे लक्षात येते आणि कथेतील मुख्य पात्र तीच आहेत स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर आणि उर्मिला कानेटकर. ''प्यारवाली लवस्टोरी''च्या प्रमोशन मध्येपण दुनियादारीचीच थीम वापरण्यात आलीय. 

खर तर प्रेक्षकांना मनोरंजन हवय, शेक्सपीरने न्हटले आहेच नावात काय ठेवलय !!!!

Monday 13 October 2014

मराठीत स्त्री दिग्दर्शकांची भरारी

सध्या मराठी चित्रपटांची संख्या चांगलीच वाढली असून आपला मराठी चित्रपट नवनविन विषय घेऊन पुढे येत आहे. त्यामुळे अनेक कलाकार व दिग्दर्शक यांना संधी मिळत आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांवरुन सहज लक्षात येते की मराठीमध्ये महिला दिग्दर्शकांचे नवीन पर्व सुरु झाले आहे. मागील काही महिन्यात जवळ पास प्रत्येक आठवड्यात महिला दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ऑगस्ट महिन्यांमध्ये सुमित्रा भावे यांचा ''अस्तु'' आणि मृणाल कुलकर्णी यांचा ''रमा माधव'' प्रदर्शित झाला, त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मनवा नाईक दिग्दर्शित ''पोरबाजार'', मृणालिनी पाटिल दिग्दर्शित ''राखणदार'' व ह्या शुक्रवारी समृद्धि पोरे यांचा ''डॉ प्रकाश बाबा आमटे'' व रेणु देसाई यांचा ''इश्क़वाला लव'' प्रदर्शित झाला आहे. दोन्ही चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मराठी चित्रपटांमध्ये सक्रिय असलेल्या महिला दिग्दर्कांमध्ये कांचन अधिकारी व सुमित्रा भावे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल कारण त्यांनी सातत्याने अनेक चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना दिलीय. मध्यंतरी रेणुका शहाणे यांनी ''रीटा'' च्या निमित्ताने आपल्या दिग्दर्शकीय कौशल्य दाखवले होती. महिला दिग्दर्शकांच्या येणाऱ्या आगामी चित्रपटांमध्ये संगीता बालचंद्रन यांच्या ''चिंतामणी'', क्रांति रेडकर यांच्या ''काकण'' आणि स्वप्ना वाघमारे जोशी यांच्या ''मितवा''चे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. यावरून आता हे महिला दिग्दर्शकांचे पर्व असेल सुरु राहणार याची शाश्वती मिळते. 

विशेष न्हणजे फक्त दिग्दर्शक न्हणुनच नव्हे तर चित्रपटांमध्ये इतर ही क्षेत्रात त्यांचा वावर वाढतो आहे. मागच्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ''सांगतो ऐका''च्या निर्माता विधि केसलीवाल आहेत. त्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ''टपाल''च्या निर्मात्या वर्षा सत्पालकर आहेत. या सर्व बाबी मराठी चित्रपटांमध्ये महिलांचा वाढता वावर स्पष्ट करणाऱ्या आहे. 

Sunday 12 October 2014

डॉ प्रकाश बाबा आमटे

ह्या शुक्रवारी तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत, ''डॉ प्रकाश बाबा आमटे'', ''पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा'' व ''इश्क़वाला लव''.

समृद्धि पोरे दिग्दर्शित '' डॉ बाबा प्रकाश आमटे '' मधून नाना पाटेकर यांनी देऊळ नंतर बऱ्याच दिवसांनी मराठीत पुनरागमन केलय, सोबतच ''डॉ प्रकाश बाबा आमटे'' यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असल्याने या चित्रपटाविषयी लोकांमध्ये बरीच उत्सुकता होती. त्याचा फायदा या चित्रपटाला होताना दिसत आहे. विविध सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून प्रेक्षकांकडून या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद व्यक्त होताना दिसतोय. नाना पाटेकर व सोनाली कुलकर्णी यांची जोडी व केमिस्ट्री हे ही ह्या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्ये न्हणावे लागेल. हि जोडी ह्या आधी उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ''देऊळ'' या चित्रपटातूनही मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. डॉ प्रकाश बाबा आमटे यांचे आत्मकथन ''प्रकाशवाटा'' ह्याच वर्षी मी वाचले असून त्यामध्ये संवेदनशील करणारे अनेक प्रसंग होते. त्यामुळे मला सुद्धा या चित्रपटाची प्रतीक्षा होती.

या शुक्रवारी प्रदर्शित झालेला ''पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा'' हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झालेल्या ''गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा'' या धमाल विनोदी राजकीयपटाचा सीक्वल आहे. एकी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले असताना, मकरंद अनासपुरे व सयाजी शिंदे अशी दिग्गज मंडळी या चित्रपटात असल्यामुळे या चित्रपटालाही मराठी प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे.  

या शुक्रवारी प्रदर्शित झालेला तीसरा चित्रपट ''इश्क़वाला लव'' हा चित्रपट एक प्रेमकथा असून ''एक वेगळी प्रेमकथा'' अशी टैग लाइन निर्मात्यांनी या चित्रपटाला दिली अाहे. आदिनाथ कोठारे अभिनीत या चित्रपटाच्या दिग्दर्शक रेणु देसाई आहेत.

या शुक्रवारी वेगवेगळ्या धाटणीचे तीन चांगले चित्रपट प्रदर्शित झालेत, तेव्हा आपल्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन नक्कीच त्यांचा आनंद घ्या.

Saturday 4 October 2014

सांगतो ऐका

सतीश राजवाडे दिग्दर्शित व सचिन पिळगावकर अभिनीत ''सांगतो ऐका'' या शुक्रवारी प्रदर्शित झालाय. ''सांगतो ऐका'' हा सामाजिक विषयवार आधारित विनोदी चित्रपट  आहे. सतीश राजवाडे व सचिन पिळगावकर यांची टीम एकत्र आल्यामुळे ''सांगतो ऐका'' कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

सतीश राजवाडे सध्या मराठीमधील आघाड़ीच्या दिग्दर्शकापैकी एक आहेत. एका मागून एक सुन्दर मराठी चित्रपटाची मेजवानी त्यांनी मराठी प्रेक्षकांना दिलीय. त्या पैकी ''मुंबई पुणे मुंबई'' व ''प्रेमाची गोष्ट'' हे माझे अाल टाइम फ़ेवरेट आहेत. ''मुंबई पुणे मुंबई'' या त्यांच्या मराठी चित्रपटाचा, त्यांनीच दिग्दर्शित केलेला हिंदी रीमेक मागच्याच आठवड्यात प्रदर्शित झालाय.   

Friday 26 September 2014

बावरे प्रेम हे, टपाल आणि राखणदार

आज तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत, बावरे प्रेम हे, टपाल आणि राखणदार. सिद्धार्थ चांदेकर व उर्मिला कानेटकर अभिनीत ''बावरे प्रेम हे'' ही प्रेमकथा असून ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक व लेखक अजय नाईक आहेत. ''दुनियादारी'' या चित्रपटानंतर उर्मिला कानेटकर यांचा प्रेक्षक वर्ग तयार झाला आहे. त्याचा फायदा या चित्रपटाला होऊ शकतो.

या शुक्रवारी प्रदर्शित झालेला दूसरा चित्रपट, नंदू माधव व वीणा जामकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला  ''टपाल'' असून संवेदनशील दिग्दर्शक न्हणुन ओळख असलेल्या मंगेश हाडवळे यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

डॉ.  मृणालिनी पाटिल दिग्दर्शित ''राखणदार'' हा एक धार्मिक चित्रपट असून या चित्रपटात अजिंक्य देव व जीतेन्द्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नवरात्रीच्या मुहूर्तावर प्रदर्शित केल्यामुळे अपेक्षित प्रेक्षक वर्ग या चित्रपटाला मिळू शकतो.

Saturday 20 September 2014

पोरबाजार, नटी आणि पहिली भेट

ह्या शुक्रवारी तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत, पोरबाजार, नटी आणि पहिली भेट. अंकुश चौधरी आणि सई ताम्हणकर अभिनीत ''पोर बाजार'' सामाजिक विषयावर आधारित असून या चित्रपटात फरहान अख्तर पाहुण्या भूमिकेत दिसणार आहे.
या शुक्रवारी प्रदर्शित झालेला दूसरा चित्रपट ''नटी'' चित्रपट नायिकेच्या जीवनावर आधारित असून यात सुबोध भावे, अजिंक्य देव व तेजा देवकर यांच्या प्रमुख भूमिका आहे.

Sunday 14 September 2014

गुरु पूर्णिमा, गुलाबी आणि आम्ही बोलतो मराठी

ह्या शुक्रवारी तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत, गुरु पूर्णिमा, गुलाबी आणि आम्ही बोलतो मराठी. गिरीश मोहिते दिग्दर्शित ''गुरु पूर्णिमा'' ही एक प्रेमकथा असून या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच उपेन्द्र लिमये व  सई ताम्हणकर यांची जोड़ी येत आहे. सचिन खेडीकर अभिनीत ''गुलाबी'' ह्या चित्रपटातुन हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक गुड्डू धनोवा मराठीत पदार्पण करीत आहेत. ह्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला तिसरा चित्रपट न्हणजे आनंद म्हैस्कर दिग्दर्शित ''आम्ही बोलतो मराठी''. विक्रम गोखले अभिनीत हा चित्रपट मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आधारित आहे.    

Saturday 6 September 2014

सचिन कुंडलकर यांची ''हैप्पी जर्नी''

गंध, निरोप आणि रेस्टॉरेंट सारख्या नावाजलेल्या मराठी चित्रपटाचे दिगदर्शक सचिन कुंडलकर पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे त्यांचा नविन सिनेमा ''हैप्पी जर्नी'' घेऊन. अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, पल्लवी सुभाष अभिनीत हा चित्रपट सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. अतुल कुलकर्णी यांनी मधंतरि हिंदी व दक्षिणेतल्या विविध भाषांमधून काम केल्यानंतर मराठी मध्ये अलीकडे नटरंग, प्रेमाची गोष्ट, पोपटच्या निमित्ताने त्यांनी आपली दर्जेदार उपस्थिति दाखवून दिली आहे.

यूटुबवर सध्या गाजत असलेल्या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये, ''हैप्पी जर्नी'' सर्वात पुढे असलेल्या चित्रपटापैकी एक आहे. आता पर्यन्त एक लाखापेक्षा अधिक हिट्स या ट्रेलरला मिळालेले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षणीय असून चित्रपटाविषयी उत्सुकता वाढवणारा आहे. ट्रेलर मध्ये सर्व कलाकार वेगळया लुक मध्ये दिसतात. भाऊ व बहिणीच्या कथेची पार्श्वभूमि असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये त्यांच्या यात्रेचा वापर करण्यात आला आहे.

सध्या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये इंग्रजीचा वापर वाढत आहे, सोबतच इंग्रजी नाव असलेल्या मराठी चित्रपटांची संख्या वाढत आहे, त्यामध्ये मॅटर, टाइम प्लीज, टाइम पास, येलो, पोश्टर बॉयज व आता ''हैप्पी जर्नी '' यांचे नाव प्रामुख्याने घेता येईल. असो ''कालाय तसमै नमः''.

Friday 5 September 2014

पोर बाजार येतोय ….

मनवा नाईक गुणी अभिनेत्री न्हणून सर्वांना परिचित आहे, आता ती ''पोर बाजार'' या चित्रपटाच्या निमित्ताने दिगदर्शकाच्या रुपात पदार्पण करीत आहे. हिंदी मधून मालिका व चित्रपट, मराठी मधून नाटक, मालिका व  चित्रपट या तिन्ही क्षेत्रात तीने अभिनय केला आहे, सोबतच न्यूयार्क विद्यापीठातून फिल्म मेकिंग चा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तिचा हा चित्रपट आगामी १९ सप्टेंबर ला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी आणि सई ताम्हणकर अशी मराठीतील  तगडी स्टार कास्ट लाभली आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्टय न्हणजे फरहान अख्तर या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे  .

सध्या या चित्रपटाचे धडाक्यात प्रमोशन सुरु असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोशल मिडिया वर हि या चित्रपटाला चांगला प्रतिसाद भेटत असून यूटूब वर ५५ हजारावर लोकांनी या चित्रपटाचा ट्रेलर बघितला असून फेसबुक वर ७ हजारावर लाइक्स या चित्रपटाला मिळालेले आहेत .

या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षणीय असून ट्रेलर मधून कथा आशय कळत असला तरी रहस्य कळू नये अशी खबरदारी घेण्यात आलेली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करेल अशी अपेक्षा करूया. 

किरण नाटकी