Thursday 9 April 2015

''काकण''च्या निमित्ताने

उद्या ''काकण'' ह्या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री क्रांति रेडकर दिग्दर्शिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत आहे, त्यानिमित्त अलीकडे अभिनेता ते दिग्दर्शक असा प्रवास केलेल्या कलाकारांचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न.  

मराठीमध्ये मास्टर विनायक यांच्यापासून चालत आलेली मराठी अभिनेता ते दिग्दर्शकाची परंपरा दादा कोंडके, अमोल पालेकर, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर ते अंकुश चौधरी यांच्या पर्यन्त पोहचली आहे. आता या परंपरेत मराठी अभिनेत्री मोलाचा वाटा उचलत आहे. दिग्दर्शक हा चित्रपट यूनिटचा कप्तान असतो असे न्हणतात, चित्रपटातील निर्माता, अभिनेता, छायाचित्रकार, लेखक, संकलक, चित्रपट समीक्षक असा प्रत्येक घटक कधी ना कधी दिग्दर्शक बनण्याचे स्वप्न बघत असतो, न्हणुनच या सर्व घटकांचे प्रतिनिधि दिग्दर्शक न्हणुन आपल्या समोर येतात.       

अलीकडे मराठीत सातत्याने सक्रिय असलेल्या अभिनेत्री ते दिग्दर्शिका असा प्रवास केलेल्यामध्ये मृणाल कुलकर्णी यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. त्यांनी अलीकडे ''प्रेम न्हणजे प्रेम न्हणजे प्रेम असते'' व ''रमा माधव'' या दोन चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी हे दोन्ही विषय अतिशय वेगवेगळ्या विषयांना घेऊन बनवले आहे. किशोरी शहाणे यांनी पण ''रीटा''च्या माध्यमातून आपले दिग्दर्शकीय कौशल्य दाखवले आहे. मागील वर्षी मनवा नाईक यांचा ''पोरबाजार'' हा चित्रपट प्रदर्शित झाला.     

अलीकडे सातत्याने मराठी मध्ये दिग्दर्शन करीत असलेल्या अभिनेत्यांमध्ये अंकुश चौधरी यांचे नाव प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल. सतत वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणाऱ्या अंकुश चौधरी यांनी ''साडे माडे तीन'', ''झक्कास'', ''नो एंट्री - पुढे धोका आहे'' या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटांपैकी ''झक्कास'' व ''नो एंट्री - पुढे धोका आहे'', या चित्रपटात त्यांची भूमिकाही होती हे विशेष.  

अमोल पालेकर यांनी ''आक्रीत'', ''बनगरवाडी'', ''कैरी'', ''ध्यासपर्व'', ''धूसर'', ''समान्तर'' व ''अनाहत'' या चित्रपटाच्या माध्यमातून वेगवेगळे विषय प्रेक्षकांसमोर आणले आहे. महेश मांजरेकर यांनी ''अस्तित्व'', ''शिक्षणाच्या आईचा घो'', ''लालबाग परळ'', ''फक्त लढ न्हणा'', ''काकस्पर्श'' व ''कोकणस्थ''च्या माध्यमातून मराठी रसिकांना पुन्हा चित्रपट गृहाकडे आणण्याची महत्त्वाची कामगीरी बजावली आहे. सचिन पिळगावकर यांनी मागील ३३  वर्षापासून अनेक दर्जेदार मेजवानी प्रेक्षकांना दिली आहे. त्यांच्या अनेक चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत, अभिनय व दिग्दर्शन एकाच वेळेस करणे खुप कठीण जाऊ शकते पण सचिन पिळगावकर यांनी. हे व्यवस्थितपणे सांभाळले. हिच गोष्ट आपण महेश कोठारे यांच्या बद्दलही न्हणु शकतो. महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत बेरडे व अशोक सराफ यांना घेऊन अनेक दर्जेदार विनोदी चित्रपट बनवले. एके काळी महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेरडे व अशोक सराफ यांची तिकडी न्हणजे यशस्वी मराठी चित्रपटाचा हमखास फार्मूला होता. आज ही ते सर्व चित्रपट टीवीवर बघतांना याचा प्रत्यय येतो. विजय पाटकर सुद्धा अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रावर सारखीच पकड ठेवतात.

२०१० साली सचित पाटिल यांनी ''क्षणभर विश्रांती'' हा अतिशय यूथफुल चित्रपट दिग्दर्शित केला होता. याच वर्षी जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी ''अाघात'' हा वैद्यकीय क्षेत्रातील भष्टाचारावर आधारित चित्रपट दिग्दर्शित केला होता. अजिंक्य देव यांनी पण २०१० साली ''जेता'' हा चित्रपट दिग्दर्शित केला. मकरंद अनासपुरे यांनी २०११ साली ''डँबीस'' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मकरंद देशपांडे यांनी मागच्या वर्षी ''सैटरडे सन्डे'' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. नागेश भोसले यांनी मागील काही वर्षात ''अडगुल मडगुल'', ''गोष्ट छोटी डोंगराएवढी'' व ''गल्लीत गोंडळ दिल्लीत मुजरा''चे दिग्दर्शन केले असून त्यांचा ''पन्हाळा'' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे.        

मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ''पोस्टर बॉयज़''च्या सीक्वेलच्या निमित्ताने श्रेयस तलपदे दिग्दर्शक बनणार असल्याची सध्या बातमी आहे. गिरीश कुलकर्णी ''जाऊ दया ना बाळासाहेब'' या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनासाठी सज्ज झाले आहेत. प्रख्यात अभिनेते सुबोध भावे ''कट्यार काळजात घुसली'' च्या निमित्ताने दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे, त्यांचा हा चित्रपट याच वर्षी नवंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 

No comments:

Post a Comment

किरण नाटकी