Saturday 18 April 2015

विदर्भातील मराठी चित्रपट सृष्टि

काल ''ते दोन दिवस'' हा नागपूरच्या रंगकर्मीनी निर्मित/ दिग्दर्शित केलेला व बहुतांश चित्रीकरण नागपूर आणि परिसरातच झालेला चित्रपट प्रदर्शित झाला. ''ते दोन दिवस''च्या निमित्ताने पुन्हा एकदा नागपूरातील पर्यायाने विदर्भातील मराठी चित्रपट सृष्टिची चर्चा होत आहे. ह्याच चर्चेच्या अनुषंगाने अलीकडे नागपूर व विदर्भामध्ये मध्ये निर्माण झालेल्या चित्रपटांचा आढावा घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. 

संत्रानगरी सोबतच नागपूरची एक ओळख प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचे शहर अशी हि सुद्धा आहे. राजकुमार हिरानी आज हिंदी चित्रपटात आघाडीचे दिग्दर्शक असल्यामुळे जेव्हा त्यांची चर्चा होते साहजिकच त्यावेळेस नागपूरची पण चर्चा होते. प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांचा जन्म सुद्धा नागपूरचा, पण नागपूरचे आणि चित्रपटाचे नाते या पेक्षा कितीतरी जुने आहे. राजकुमार हिरानी व सुभाष घई हि फ़क्त प्रतिनिधिक उदाहरणे आहेत, त्यांच्या बरोबरीने मूळचे नागपूरचे बरेच कलाकार हिंदी व मराठी चित्रपट सुष्टित, टिवीवर कलाकार, दिग्दर्शक, निर्माते व तंत्रज्ञ न्हणुन चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत.

मागील दशकात मराठी चित्रपट सुष्टित बरेच बदल घडून आले. मराठी चित्रपट रसिक पुन्हा चित्रपट गृहाकडे वळु लागला. चित्रपटांची संख्या वाढू लागली. नवनवीन विषयामुळे साहजिकच नवनवीन चित्रीकरण स्थळाचा शोध घेणे भाग पडले, सोबतच विदर्भातून नवीन दमाचे निर्माते व दिग्दर्शक मराठी चित्रपट सुष्टित आपली ओळख निर्माण करू लागले. त्यामुळे साहजिकच विदर्भात चित्रपट निर्मितीची संख्या वाढू लागली. मागील वर्षात विदर्भात निर्माण झालेल्या चित्रपटाचा आढावा घेतला असता हीच बाब निदर्शनास येते. असे असेल तरी जर मराठी चित्रपटांमध्ये काम करायचे असेल तर मुंबईला स्थाईक होणे गरजेचे होते. आता हि परीस्थिती फारसी बदललेली नसली तरी कुठेतरी या बदलाची प्रक्रिया नक्कीच सुरु झाली आहे. 

कालच प्रदर्शित झालेल्या ''कोर्ट'' आणि ''ते दोन दिवस'' या चित्रपटांचे महत्वाचे नागपूर कनेक्शन आहे. राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या ''कोर्ट'' या चित्रपटात नागपूरचे वीरा साथीदार केंद्रीय भूमिकेत आहेत तर ''ते दोन दिवस'' या चित्रपटात निर्माते, दिग्दर्शक, कलावंत सब कुछ नागपूरकर आहे.     

विदर्भातील विलास उजवणे, गिरीश ओक या सारख्या दिग्गज कलाकारांनी चित्रपटांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. आता भरत गणेशपुरे, केतकी माटेगावकर, वैभव तत्ववादी, समिधा गुरु या सारखे वैदर्भीय कलावंत आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. संजय सुरकर यांनी आपल्या आशयपूर्ण चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले, त्यांच्या अकाली निधनामुळे चित्रपट सुष्टीचे नुकसान झाले. आता तेजस देऊस्कर, आशीष उबाळे, अभिजीत गुरु हे दिग्दर्शन मराठी चित्रपट सुष्टित विदर्भाचे प्रतिनिधित्व करत आहे. या दिग्दर्शकांनी विदर्भामध्ये चित्रपट निर्मिती करत अनेक स्थानिक कलावंतांना आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून संधी दिली आहे. दिग्दर्शकांबरोबरच विदर्भातील निर्मात्यांची भूमिका ही महत्त्वाची राहिली आहे.                            

आशीष उबाळे यांनी ''हिरवा चूड़ा'' व ''बाबुरावला पकडा'' या दोन चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यापैकी ''हिरवा चूड़ा''चे चित्रीकरण नागपूरला तर मल्टीस्टारर ''बाबुरावला पकडा''चे चित्रीकरण चक्क बैंकॉकला करण्यात आले होते. अभिजीत गुरु या युवा दिग्दर्शकाने नागपूरच्या कलवंतांना घेऊन ''दिमाग झालाय ख़राब'' (२०१२) हा चित्रपट दिग्दर्शित केला.  या चित्रपटाचे निर्माते सुद्धा नागपूरकर प्रकाश लखानी होते. 

सतीश मनवर दिग्दर्शित व गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी अभिनीत ''गाभ्रीचा पाऊस'' ह्या २००९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे सम्पूर्ण चित्रीकरण अमरावतीच्या ग्रामीण भागात झाले होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर आधारित या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवण्यात आले होते. विदर्भातील शेतकऱ्यांचे ग्रामीण जीवन साकारतानां विदर्भातील खऱ्या खेड्यात चित्रीकरण झाल्यामुळे, या चित्रपटात वास्तविकपणा आला होता. या चित्रपटात नागपूरचे कलावंत मुकुंद वसूले, विनोद राऊत यांनी पण महत्वाच्या भूमिका सकारल्या होत्या.          

केदार शिंदे दिग्दर्शित व सिद्धार्थ जााधव, सोनाली कुलकर्णी अभिनीत ''इरादा पक्का'' ह्या २०१० साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या माध्यमातून स्मिता मेघे यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकले. ''इरादा पक्का''चे चित्रीकरण नागपूर व चिखलदरा परिसरात करण्यात आले होते. याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ''जेता'' या चित्रपटाच्या माध्यमातून लोकमत वृत्तपत्र समुहाने चित्रपट निर्मितीत पाऊल टाकले. 

२०१२ साली नागपूरचे निर्माते राजू घिवधोंडे, मंगेश पितळे, रमण सेनाड यांनी वैद्यकीय क्षेत्रातील भष्टाचारावर आधारित ''अघोर'' या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागपूरचेच प्रसिद्ध नाट्यकर्मी दिग्दर्शक सलीम शेख यांनी केले होते तर प्रमुख भूमिकेत संतोष जुवेकर, अनिकेत विश्वासराव, सई ताम्हणकर, किशोरी शहाणे होते. या चित्रपटाचे चित्रीकरण सुद्धा नागपूरला झाले होते.          

२०१३ साली प्रदर्शित झालेला संजीव कोलते दिग्दर्शित ''तानी'' हा चित्रपट ही सम्पूर्णपणे नागपूरमध्ये चित्रित करण्यात आला होता. या चित्रपटात तानीची प्रमुख भूमिका केतकी माटेगावकर यांनी केली होती तर तानीच्या वडिलाच्या भूमिकेत अरुण नलावडे होते. या चित्रपटाचा सेट फूटाळा तलाव क्षेत्रात लावण्यात आला होता. याच वर्षी नागपूरचे निर्माते संदीप केवलानी यांचा संदीप कुलकर्णी अभिनीत ''अजिंक्य'' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे चित्रीकरण नागपूर येथील क्रीडा संकुलात करण्यात आले होते. विशेष न्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस देऊस्कर मूळचे नागपूरचेच आहेत. २०१३ साली निर्माते इंजीनियर मोरेश्वर मेश्राम यांचा ''रेला रे'' हा भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी येथे चित्रित झालेला व उपेन्द्र लिमये यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शित झाला होता. जेव्हा आपण विदर्भामध्ये चित्रपट निर्मितीचा विचार करतो तेव्हा इंजीनियर मोरेश्वर मेश्राम यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. इंजीनियर मोरेश्वर मेश्राम ''३१ डिसेम्बर''(२०१२)  व ''रेला रे''(२०१३) हे दोन मराठी चित्रपटाचे निर्माते आहेत. अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले मोरेश्वर मेश्राम हे विदर्भामध्ये सातत्याने चित्रपट निर्मिती करत असून या माध्यमातून त्यांनी अतिशय वेगवेगळे विषय प्रेक्षकांसमोर आणले आहे. २०१४ साली त्यांनी ''लास्ट बेन्चर्स'' या हिंदी चित्रपटाची निर्मिती सम्पूर्ण नागपूरकर असलेल्या टीमला घेऊन केली.     

नागपूरमध्ये सातत्याने चित्रपट निर्मिती करणारे व्यक्तिमत्व न्हणजे श्याम धर्माधिकारी. चित्रपट निर्मितीच्या सर्वच क्षेत्रावर पकड ठेवणारे श्याम धर्माधिकारी यानी मराठी सोबतच हिंदी आणि भोजपुरी भाषेतही चित्रपट निर्मिती केली आहे.    

विदर्भात अगदी अलीकडे चित्रित झालेला चित्रपट न्हणजे मागील वर्षी सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो''. डॉ प्रकाश बाबा आमटे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे चित्रीकरण खऱ्या लोकेशंस न्हणजे गडचिरोली जिल्हाच्या भामरागड़ भागात झाले होते. नाना पाटेकर व सोनाली कुलकर्णी अशी दिग्गज मंडळी असलेला हा चित्रपट, या दुर्गम भागात व आदिवसींसोबत चित्रीकरण केल्यामुळे खूपच सुन्दर झाला होता.      

''कापूस कोंड्याची गोष्ट'' या चित्रपटाचे चित्रीकरण यवतमाळ जिल्हामधील पुसद येथे झाली आहे. या चित्रपटामधून शेतकरी वडिलाच्या मृत्यूनंतर होणारा शेतकऱ्यांचा मुलींचा संघर्ष दाखवण्यात अलाय. या चित्रपटात मकरंद अनासपुरे, भरत गणेशपुरे व नागपूरच्या समिधा गुरु यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका मृणालिनी भोसले आहेत. या चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत असून विदर्भात चित्रित झालेला चित्रपट पहिल्यांदाच ऑस्करच्या शर्यतीत दाखल झालाय. त्याच्यासाठी निर्मात्याचेही विशेष कौतुक करायला हवे.          

आता फ़क्त नागपूरमध्येच नाही तर विदर्भाच्या इतर ही जिल्हांमध्ये चित्रपट निर्मिती होत आहे. हि विदर्भाच्या सांस्कृतिक चळवळीसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. विदर्भात चित्रीकरण झाल्यामुळे येथील स्थानिक कलावंतांना एक व्यासपीठ उपलब्ध होत असते. स्थानिक कलावंत ही या संधीचा चाांगला उपयोग करून घेतात हे या पूर्वी विदर्भात चित्रित झालेल्या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. 

विदर्भात चित्रीकरण करण्यासाठी अनेक चांगल्या लोकेशंस उपलब्ध आहेत, हे ह्या पूर्वी विदर्भात चित्रीकरण झालेल्या चित्रपटांनी दाखवून दिले आहे. आता विदर्भात चित्रपट निर्मितीसाठी या गोष्टीचे मार्केटिंग करणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी सरकार, स्थानिक निर्माते, कलावंत, वृत्तपत्र यांची भूमिका अतिशय महत्वाची राहणार आहे. त्या दृष्टीने सरकारने नागपूरमध्ये फिल्म सिटी उभारण्याचा विचार करणे गरजेचे आहे. नागपूरमध्ये फिल्म सिटी उभारल्यामुळे चित्रपट निर्मितीसाठी असलेल्या सर्व आवश्यक सोयी सुविधा एका ठिकाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. सध्या देवेन्द्र फडणवीस हे नागपूरकर असलेले अतिशय अभ्यासु व्यक्तिमत्व मुख्यमंत्रीपदि असल्यामुळे या बाबतीत पाउले उचलली जातील अशी अपेक्षा करुया. विदर्भात चित्रीकरण वाढल्यामुळे स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध होईल. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

No comments:

Post a Comment

किरण नाटकी