Wednesday 17 June 2015

''शुगर, सॉल्ट आणि प्रेम''च्या निमित्ताने

चित्रपट निर्मितीची सुरुवात साधारणत गोष्ट लिहिण्यापासून सुरु होते व त्यानंतर सगळयात महत्वाची गोष्ट न्हणजे चित्रपटाचे नाव. चित्रपटाचे नाव समर्पक असेल तर त्याचा फायदा चित्रपटाला होतो पण अनेकदा चित्रपटाचे नाव आकर्षक करण्याच्या नादात, चित्रपटाचे नाव जरा हटके ठेवण्यात येते. मागील आठवड्यात प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाचे नाव आहे, ''शुगर, सॉल्ट आणि प्रेम''. आता ''शुगर, सॉल्ट आणि प्रेम''च्या नावावरून काय बोध होतो? ''शुगर, सॉल्ट आणि प्रेम''च्या निमित्ताने आपण अशा जरा हटके मराठी चित्रपटाच्या बद्दल थोडी माहिती घेऊया. अशा प्रकारे खाण्यापिण्याच्या वस्तूवरून चित्रपटाचे नाव ठेवण्याची हि पहिली वेळ नाही, या पूर्वी मागील काही वर्षात ''हापूस'', ''मसाला'', ''कैफेचिनो'', ''एक कप चहा'', ''कॉफी आणि बरेच काही'' असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहे. आता ''तहान'' नावाच्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. ''कांदे पोहे'' नावाचा एक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.  आता ह्या सगळया चित्रपटाचे नाव ऐकून तुमच्या तोंडाला पाणी सुटले असेल तर त्यात नवल कसले!

अशाच प्रकारे मराठी चित्रपटाची नावे इंग्लिशमध्ये किंवा मराठी-हिंदी-इंग्लिश रीमिक्स ठेवण्याचा ट्रेंड मराठीत चित्रपट सृष्टीत मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. येत्या काळात ''ब्लैकबोर्ड'', ''ड्रिम मॉल'', ''शटर'', ''मर्डर मेस्ट्री'', ''शार्टकट'', ''बॉयोस्कोप'', ''७ रोशन विला'', ''ब्लैंकेट'', ''चीटर'', ''डिश्युम'', ''डॉट कॉम मॉम'', ''फाइव डेज'', ''फ्रेंडशिप डॉट कॉम'', ''मुंबई टाइम'', ''पोलिस लाईन'', ''रेडियो नाइट्स'', ''स्लैमबुक'', ''सनराइज'', ''सुपर्ब प्लान'', ''द साइलेंस'', ''यस आय कैन'', ''युथ'' अशा इंग्लिश नावाचे मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या सोबतच येत्या काळात ''टाइम बरा वाईट'', ''वांटेड बायको नं १'', ''वेल कम ज़िन्दगी'', ''ऑनलाइन बिनलाईन'', ''कैरी ऑन मराठा'', ''धिनचाक एंटरप्राइज २०१५'', ''नीलकंठ मास्टर'', ''तू ही रे'', ''फैमिली कट्टा'', ''राजवाडे एंड सन्स'', ''बाइकर्स अड्डा'', ''कैरी ऑन देशपांडे'', ''एक नंबर'', ''एक थ्रिलर नाईट'', ''हटके लव स्टोरी'', ''जब मिले छोरा छोरी'', ''जीत'', ''लाठी'', ''लोच्या ऑनलाइन'', ''स्टोरी हाय पण खरी हाय'', ''वा रे जिंदगी'', ''वेल डन भाल्या'', ''यारी दोस्ती'' अशा मराठी-हिंदी-इंग्लिश रीमिक्स नावाचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मांगे एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते ''याचा काही नेम नाही''. असेच काही मराठी चित्रपटांच्या नावाबाबत होत आहे. प्रदर्शित होणाऱ्या आगामी मराठी चित्रपटाच्या यादीत ''घंटा'' नावाचा एक चित्रपट आहे. आता खरच प्रेक्षक ''घंटा'' बघायला जाणार? एक अजुन चित्रपट प्रदर्शित होत आहे, त्याचे नाव आहे, ''वाजलाच पाहिजे! गेम की सिनेमा''. अशा चित्रपटाच्या नावातून चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण होत असली तरी बहुधा प्रेक्षकांचा गोंधळ उडण्याची पण शक्यता असते.   


No comments:

Post a Comment

किरण नाटकी