ह्या शुक्रवारी तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत, ''सासुच स्वयंवर'', ''ऋण'' आणि ''युद्ध''.१ मे ला प्रदर्शित ''टाइमपास २'' ने टिकिट खिडकीवर नवीन उच्चांक गाठले त्यामुळे मागील आठवड्यात मराठी चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. ह्या आठवड्यात तब्बल तीन चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे त्यांची चुरशीची स्पर्धा बघायला मिळेल.
ह्या आठवड्यात प्रदर्शित झालेले तिन्ही चित्रपट वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ''सासुचे स्वयंवर'' हा विनोदी चित्रपट आहे, ''ऋण'' व ''युद्ध'' हे सामाजिक विषयावर आधारित चित्रपट आहे.
ओमकार माने दिग्दर्शित ''सासुच स्वयंवर'' मध्ये पुष्कर जोग, तेजा देवकर, विजय चव्हाण, जयवंत वाडकर, सतीश तारे व सुनील पाल यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत तर सासूच्या भूमिकेत विशाखा सुभेदार दिसणार आहेत. अगदी नावावरूनच आगळा वेगळा वाटणारा हा चित्रपट प्रेक्षकांना किती हसवतो यावरुन या चित्रपटाचे यश ठरणार आहे.
विशाल गायकवाड़ दिग्दर्शित ''ऋण'' हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट असून यात एका ग्रामीण युवकाच्या संघर्षाची गोष्ट आहे. या चित्रपटामध्ये मनोज जोशी, नारायणी शास्त्री, राजेश्वरी सचदेव, ओमकार गोवर्धन, विनय आपटे, विजय पाटकर, अनंत जोग, विवेक लागू, उषा नाइक व जयराज नायर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी व नारायणी शास्त्री तृतीय पंथीयांच्या भूमिकेत दिसणार आहे.
राजीव रूइया दिग्दर्शित ''युद्ध - अस्तित्वाची लढाई'' या चित्रपटात राजेश श्रृंगारपुरे, तेजस्विनी पंडित, क्रांति रेडकर, पंकज विष्णु, वर्षा उसगांवकर, स्मिता ओक, संजय कुलकर्णी, सोमनाथ तडवलकर, शीतल मंत्री यांच्या भूमिका आहेत. राजीव रूइया यांनी हिंदीमध्ये ''माय फ्रेंड गणेशा''सह अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
ह्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या सर्वच चित्रपटामध्ये हिंदी चित्रपट सृष्टितील कलावंताच्या महत्वाच्या भूमिका आहेत, यावरून मराठी चित्रपट सृष्टिचे वाढते आकर्षण व आवाका लक्षात येतो. हे टिकून राहण्यासाठी या चित्रपटांना टिकिट खिडकीवर यश मिळणे अत्यंत महत्वाचे आहे.
पुढील आठवड्यात केदार शिंदे दिग्दर्शित व सोनाली कुलकर्णी यांची भूमिका असलेला ''अरे बाई अरेच्या २'' प्रदर्शित होतोय, त्यामुळे ह्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना आणखी स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे.
No comments:
Post a Comment