Friday 1 May 2015

हाऊसफुल ''टाइमपास २''

आज रवी जाधव यांचा ''टाइमपास २'' हा हाऊसफुल चित्रपट प्रदर्शित झाला. ''टाइमपास २'' मध्ये प्रियदर्शन जाधव व प्रिया बापट यांनी ''दगडू'' व ''प्राजक्ता'' यांच्या प्रमुख भूमिका केल्या आहेत. ''टाइमपास'' मधील ''दगडू'' व ''प्राजक्ता'' प्रथमेश परब व केतकी माटेगावकर यांच्या हि महत्वाच्या भूमिका या चित्रपटात आहे. अभिनयासोबतच प्रियदर्शन जाधव यांनी ''टाइमपास २'' च्या पटकथालेखकाची महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे, ''टाइमपास'' मध्येही ते पटकथा लेखकाच्या भूमिकेत होते हे विशेष. ''टाइमपास २'' मध्ये संदिप पाठक, नयन जाधव, समीर खांडेकर, भालचंद्र कदम, वैभव मांगळे, चिन्मय केलकर, आरती वडगावकर, क्षिती जोग, उर्मिला कानिटकर, भूषण प्रधान, उदय सबनीस, सम्पदा जोगळेकर, सुप्रिया पठारे आणि शशांक केवळे अशी दर्जेदार कलाकारांची फौज आहे.

मागील काही वर्षापासून नागपूरची ''लक्ष्मी टॉकीज'' हे नागपूरमधील मराठी चित्रपटांच्या प्रेक्षकांसाठी हक्काच ठिकाण बनलय. आज ''लक्ष्मी टॉकीज'' मध्ये ''टाइमपास २'' चा पहिला शो हाऊसफुल झालाय. मी कुठल्या चित्रपटासाठी आज पहिल्यांदाच हाऊसफुलचा बोर्ड बघितला. मला टिकिट मिळाली नाही हे वेगळे सांगायला नको. अनेक प्रेक्षकांना ''टाइमपास २''चे टिकिट न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला. ३.३० च्या शो ची टिकिट मिळवण्यासाठी प्रेक्षकांनी १२. ३० वाजतापासूनच रांगा लावल्या होत्या.     

मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये फारशी स्पर्धा बघायला मिळत नाही पण आज ''टाइमपास २'' ने अक्षय कुमार यांच्या ''गब्बर''ला टिकिट खिडकीवर तगडी टक्कर दिल्याचे चित्र बघायला मिळाले आहे. ''रवी जाधव'' व ''टाईमपास'' ची लोकप्रियता, चित्रपटाची कास्ट, सोशल मीडियाचा प्रभावी वापर, त्यातून चित्रपटाविषयी निर्माण केलेली उत्सुकता, देखणा व भव्य संगीत प्रकाशन सोहळा या सर्वाचा गोष्टीच्या एकंदरीत नियोजनामुळे ''टाइमपास २'' ला फायदा झालाय. रवी जाधव यांना जाहिरात क्षेत्राची पार्श्वभूमी असल्यामुळे ते प्रमोशन्समध्ये निष्णात आहेत. प्रियदर्शन जाधव व प्रिया बापट सोबतच ''टाइमपास''ची जोडी प्रथमेश परब व केतकी माटेगावकर यांना ही प्रमोशनमध्ये महत्त्व देण्यात आले आहे. सोबतच सोनाली कुलकर्णी यांच्यावर ''मदन पिचकारी'' हे आइटम सांग चित्रित करण्यात आले आहे, त्यांचा हि चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी वापर करण्यात आला आहे. ''टाइमपास २'' टिकिट खिडकीवर नवे रेकॉर्ड निर्माण करेल यात काहीही शंका नाही.

No comments:

Post a Comment

किरण नाटकी