Tuesday, 31 March 2015

''मित्रा''च्या निमित्ताने

रवी जाधव यांच्या ''मित्रा'' लघुपटाला या वर्षी सर्वोकृष्ठ लघुपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. ''मित्रा'' हा लघुपट ''बॉयोस्कोप'' या चित्रपटाचा भाग आहे. चार कविता व त्या कवितांवर आधारित चार लघुपट असे या चित्रपटाचे स्वरुप आहे. ''चार दिग्दर्शक, चार कविता, एक चित्रपट'' अशी टैग लाईन या चित्रपटाला देण्यात आली आहे. रवी जाधव, विजु माने, गजेन्द्र अहिरे, गिरीश मोहीते यांनी संदीप खरे, किशोर कदम ''सौमित्र'', ग़ालिब व लोकनाथ यशवंत यांच्या कवितांवर आधारित लघुपटांचे दिग्दर्शन केले आहे. 

रवी जाधव दिग्दर्शित ''मित्रा'' मध्ये वीणा जामकर, मृगमयी देशपांडे व संदीप खरे यांच्या प्रमुख भूमिका आहे. संदीप खरे यांच्या कवितेवर व विजय तेंडुलकर यांच्या कथेवर आधारित या लघुपटामध्ये संदीप खरे पहिल्यांदाच अभिनय करताना दिसणार आहे. रवी जाधव यांनी १९४७ च्या काळातील दोन मैत्रिणींची हि कथा ब्लैक एंड व्हाइट पदध्तीने चित्रित केली आहे. 


रवी जाधव यांनी ''नटरंग'', ''बालगंधर्व '', ''बालक पालक'' व ''टाइमपास''च्या माध्यमातून रसिकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ''मित्रा''च्या निमित्ताने ''नटरंग''नंतर पुन्हा एकदा राष्ट्रिय पुरस्काराची मोहर त्यांच्या कर्तृत्वावर उमटली आहे. त्यांच्या येणाऱ्या ''टाईमपास २'' चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे.  

''बॉयोस्कोप''मध्ये विजु माने यांनी किशोर कदम ''सौमित्र'' यांच्या कवितेवर आधारित ''एक होता काऊ'' या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. ''एक होता काऊ'' मध्ये कुशल बद्रिके व स्पृहा जोशी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. विद्याधर जोशी, संपदा जोगळेकर व आनंद म्हैस्कर यांची साथ त्यांना लाभली आहे. ''एक होता काऊ'' मध्ये गोरीपान मुलगी व तिच्यावर प्रेम करणाऱ्या साधारण मुलाची गोष्ट आहे. 

''गोजिरी'', ''ती रात्र'', ''शर्यत'' व ''खेळ मांडला'' या चित्रपटांचे दिग्दर्शक विजु माने वेगवेगळ्या विषयावर अतिशय देखणे चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. प्रेक्षक त्यांच्या येणाऱ्या ''चूक भूल द्यावी घ्यावी'' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. ''चूक भूल द्यावी घ्यावी'' हा मराठीतील पहिला रोड मूवी प्रकरातील चित्रपट असणार आहे. 

''बॉयोस्कोप''मध्ये गजेन्द्र अहिरे यांनी ग़ालिब यांच्या गझलेवर आधारित ''दिले नादान'' या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. या लघुपटामध्ये नीना कुलकर्णी व सुहास पळशीकर यांची प्रमुख भूमिका आहे. ह्या लघुपटाच्या माध्यमातून गजेन्द्र अहिरे यांनी खानदानी कलावंताच्या उतारवयातील ठहराव मांडलाय.  

गजेन्द्र अहिरे मागील तीन दशकांपासून नाटक, टीवी व चित्रपटांच्या माध्यमातून कार्यरत असून त्यांना राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी ''विठ्ठल विठ्ठल'', ''नॉट ओनली मिसेस राउत'', ''सरीवर सरी'', ''सैल'', ''सावर रे'', ''त्या रात्री पाऊस होता'',''नातिगोती'', ''दिवसानं दिवस'', ''बयो'', ''शेवरी'', ''एक क्रांतिवीर - वासुदेव बलवंत फड़के'', ''गुलमोहर'', सुम्भराण'', ''पारध'', ''समुद्र'', ''एका शब्दात सांगतो'',  ''हैल्लो जयहिन्द'', ''पिपानी'', ''टूरिंग टॉकीज'', ''अनुमति'', ''पोस्टकार्ड'', ''अनवट'', ''स्वामी पब्लिक लिमिटेड'' सारखे वेगवेगळ्या सामाजिक विषयावर आशयपूर्ण व सुन्दर चित्रपट बनवले आहे. अतिशय कमी वेळात चित्रपट बनवण्यासाठी ते प्रसिद्ध असेल तरी त्यांचा प्रत्येक चित्रपट एक वेगळा अनुभव असतो. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये ''नीलकंठ मास्टर'' व ''टाच'' या चित्रपटाचा समावेश आहे.     

''बॉयोस्कोप''मध्ये गिरीश मोहीते यांनी लोकनाथ यशवंत यांच्या कवितेवर आधारित ''बैल'' या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. या लघुपटामध्ये मंगेश देसाई, स्मिता ताम्बे, सागर करंडे व उदय सबनीस प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ''बैल'' हि कथा शेतकऱ्यांची त्याच्या बैलावर असलेल्या प्रेमाची गोष्ट आहे.

यापूर्वी गिरीश मोहिते यांनी ''तुला शिकवीन चांगला धड़ा'', ''पिकनिक'', ''हि पोरगी कुणाची'', ''बे दुने साडे चार'', ''मनातल्या मनात'', ''प्रतिबिम्ब'', ''भारतीय'' व  ''गुरु पूर्णिमा''च्या माध्यमातून वेगवेगळे विषय मराठीत हाताळले आहे व ते प्रेक्षकांच्या पसन्तीत उतरले आहे.   

हिंदी चित्रपटांमध्ये अनेक लघुपटांना मिळून एक पूर्ण लांबीचा चित्रपट बनवण्याचे अनेक प्रकार झाले आहेत पण कवितांवर लघुपट करण्याची अभिनव कल्पना पहिल्यांदाच करण्यात अाली आहे.

No comments:

Post a Comment

किरण नाटकी