Sunday 22 March 2015

''हंटर''च्या निमित्ताने

सध्या ''हंटर'' या हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने सई ताम्हणकर व राधिका आपटे या दोन मराठमोळ्या अभिनेत्रींचे नाव चर्चेत आहे. सई ताम्हणकर यांनी आपल्या करियरच्या सुरवातीपासूनच या आधी ''गजनी'' व ''ब्लैक एंड व्हाईट'' या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. तर राधिका आपटे यांनी मराठी सोबतच हिंदी, बंगाली, तेलगू, तामील आणि मल्यालम अशा विविध भाषिक चित्रपटांमधून अभिनय केला आहे. मराठी मुलाची गोष्ट असल्यामुळे साहजिकच ''हंटर''मध्ये सई ताम्हणकर व राधिका आपटे यांच्यासोबतच हंटर मध्ये रविन्द्र मंकणी, नीना कुलकर्णी, ज्योति सुभाष आणि विवेक तत्ववादी अशी मराठी कलाकारांचा अभिनय बघायला मिळणार आहे. अलीकडे प्रदर्शित झालेल्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका होत्या, अनुराग कश्यप दिग्दर्शित ''अग्ली'' मध्ये गिरीश कुलकर्णी यांच्या भूमिकेची सकारात्मक दखल सर्वच समीक्षकांनी घेतली होती. ''अब तक छप्पन २'' मध्ये तर नाना पाटेकर यांच्या सोबतच विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर व ऋषिकेश जोशी अशी दमदार मराठी कलाकारांची फौजच होती. सध्या बॉलीवुड मध्ये मराठी कलाकारांची चलती आहे असेच न्हणावे लागेल.      

ज्याप्रमाणे सध्या दर दुसऱ्या किवा तिसऱ्या मराठी चित्रपटात बॉलीवुडमधील कलाकार दिसून येतात त्याच प्रमाणे बॉलीवुडमध्ये सध्या मराठी कलाकार दिसून येत आहेत. मागे एका मराठी अभिनेत्रीने तिच्या मुलाखतीत ''बॉलीवुड मध्ये छोटया भूमिकेसाठीही खुप चांगले पैसे मिळतात'' असे सांगितल्याचे आठवते. बॉलीवुड मध्ये काम करणारे अनेक मराठी कलाकार आहेत पण मराठी हीरो मात्र बॉलीवुडमध्ये बोटांवर मोजण्याइतकेच आहेत.

पूर्वी लक्ष्मण बर्डे सारखे मराठी सुपरस्टार हिंदी मध्ये चरित्र कलाकाराच्या भूमिका करायचे तर त्यांच्यावर टिका व्हायची. अशोक सराफ मात्र मराठी बरोबर हिंदी चित्रपटांतही नियमितपणे सक्रिय राहिले. मराठी व हिंदी दोन्ही ठिकाणी नियमितपणे सक्रिय असलेल्या मराठी कलाकारांमध्ये सचिन पिळगावकर, सदाशिव अमरापुरकर, रमेश देव, विक्रम गोखले, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, विनय आपटे, मोहन जोशी, शिवाजी साटम, विजय पाटकर, सचिन खेडेकर, अजिंक्य देव, संदीप कुलकर्णी, संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, राजेश श्रृंगारपुरे, नागेश भोसले, अनंत जोग, यतिन कार्येकर, उदय टिकेकर, प्रसाद ओक यांची नावे ठळकपणे घेता येईल, हि यादी बरीच लांब आहे. मराठी व हिन्दी सोबतच अतुल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, महेश मांजरेकर व सयाजी शिंदे यांनी दाक्षिणात्य चित्रपटांतही बरेच नाव कमावले आहे. मराठी अभिनेत्यांप्रमाणे, मराठी अभिनेत्रीही हिंदी व इतर भाषिक चित्रपटात तितक्याच सामर्थ्यपणे कार्यरत आहेत, ''हंटर''च्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.  

महेश मांजरेकर निर्मित व दिग्दर्शित हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक मराठी कलाकारांना संधी दिली आहे, त्यांच्या वास्तव, प्राण जाये पण शान ना जाये, जिस देश में गंगा रहता है, सिटी ऑफ़ गोल्ड सारख्या चित्रपटांमधून अनेक मराठी कलाकारांची फौज दिसते. सचिन कुंडलकर यांच्या ''अय्या'' मधून सुबोध भावे यांनी हिंदित डेब्यू केला होता. रोहित शेट्टी यांनी पण ''गोलमाल'' सीरीज व ''सिंघम'' सीरीज मध्ये श्रेयस तलपडे, सचिन खेडेकर, अश्विनी कळसेकर, सोनाली कुलकर्णी, जीतेन्द्र जोशी यांनी भूमिका केल्या आहेत.

1 comment:

किरण नाटकी