Sunday 15 March 2015

सीक्वलची सुनामी

हॉलीवुडमध्ये सीक्वलचा खुप जूना इतिहास आहे. बॉलीवुडमध्येही मागील दहा ते पंधरा वर्षात अनेक चित्रपटाचे सीक्वल निघाले, पण त्यात प्रेक्षकांना चांगला चित्रपट देण्याऐवजी मागील चित्रपटाची ब्राण्ड वैल्यू वापरण्यावर अधिक भर होता त्यामुळे बॉलीवुडमधील बऱ्याच सीक्वल चित्रपटांना तिकीट खिडकीवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता हे सीक्वलचे लोण मराठी चित्रपटांमध्येही पसरायला लागले आहे. येणाऱ्या काळात मराठी चित्रपटाच्या सीक्वलची लाट नव्हे सुनामी बघायला मिळणार आहे.

अलीकडे ''झपाटलेला २'', ''चिंटू २'' व ''पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा'' वगळता फारसे सीक्वल मराठी चित्रपट सृष्टीमध्ये बघायला मिळाले नाहीत. या पैकी ''झपाटलेला २'' वगळता इतर चित्रपटाची चर्चाही फार झाली नाही. पण आता हे चित्र पूर्णपणे बदललेले बघायला मिळणार आहे. ''टाइम पास २'', ''अग बाई अरेच्या २'', ''मुंबई पुणे मुंबई २'', ''पोस्टर बॉयज़ २'' व ''क्लासमेट्स २'' हे मराठी चित्रपटाचे सीक्वल निर्मितीच्या वेगवेगळया अवस्थेत आहेत. या पैकी ''टाइम पास २'' व ''अग बाई अरेच्या २'' या सीक्वलसचे ट्रेलर प्रसिद्ध झाले असून त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ''मुंबई पुणे मुंबई २''चे चित्रीकरण सुरु आहे. ''पोस्टर बॉयज़''चे निर्माते व प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तलपदे आता ''पोस्टर बॉयज़ २''च्या निमित्ताने दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसणार आहे. याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ''क्लासमेट्स''च्या सक्सेस पार्टीत ''क्लासमेट्स २'' ची घोषणा करण्यात आली आली आहे. एका वेबसाइटवर आलेल्या बातमीनुसार पुष्कर जोग यांनी त्यांच्या जबरदस्त या चित्रपटाच्या सीक्वल असलेल्या ''जबरदस्त २'' या चित्रपटाची घोषणा केली आहे.

मराठी चित्रपटाचे सीक्वल हे मराठी चित्रपटांमध्ये वाढत असलेल्या व्यावसायिकतेचे उदाहरण आहे, यामुळे मराठी चित्रपट सृष्टि अधिकाधिक समृद्ध होण्यासच मदत होणार आहे. सोबतच या चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद सीक्वलची लाट किती वेळ टिकेल हे ठरवणार आहे.

No comments:

Post a Comment

किरण नाटकी