Tuesday, 31 March 2015

''कॉफी आणि बरेच काही''च्या निमित्ताने

सध्या मराठी युवक मोठ्या प्रमाणावर मराठी चित्रपटांकडे वळत आहेत, त्यामुळे युवकांच्या आवड व निवड लक्षात घेऊन चित्रपट बनवले जात आहेत. मराठी चित्रपटांमध्ये युवकांशी संबधित विषयांना प्राधान्य देण्यात येत आहे. असाच एक चित्रपट ''कॉफी आणि बरेच काही'' या शुक्रवारी प्रदर्शित होतोय. रवी जाधव प्रस्तुत ''कॉफी आणि बरेच काही'' आजच्या युवकांची, त्यांच्या प्रेम व लग्नविषयक संकल्पनाची गोष्ट आहे. करियरमुळे लग्नाचे वय वाढत आहे, त्याचबरोबर युवकांमध्ये लग्नविषयक अनेक प्रश्न व दुविधा असतात. नेमक्या ह्याच प्रश्नांना घेऊन अलिकडल्या काळात अनेक मराठी चित्रपटांची निर्मिति झाली आहे. हा प्रश्न मराठी चित्रपट वेगवेगळ्या प्रकारे मांडताना दिसून येत अाहे. 

अलीकडच्या काळात ''मिस मैच'', ''तप्तपदी'', ''मंगलाष्टक वन्स मोर'', ''लग्न पहाव करून'', ''टाईम प्लीज'', ''असा मी तशी ती'', ''काकस्पर्श'', ''मुंबई पुणे मुंबई'', ''सनई चौघडे'', ''फॉरेनची पाटलीण'', ''मणि मंगलसूत्र'', ''यंदा कर्त्तव्य आहे'', ''दोघी'' हे चित्रपट लग्न संस्थेविषयी चर्चा करतांना दिसून येतात. ''सनई चौघडे''मध्ये कुमारी मातेचा प्रश्न तर ''काकस्पर्श''मध्ये बाल विधवेचा प्रश्न अतिशय संवदेनशीलपणे हाताळण्यात आला होता. लग्नावरच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये ''मुंबई पुणे मुंबई २'' या चित्रपटाची टैग लाईन ''लग्नाला यायच'' अशी आहे.   

काही चित्रपट लग्नानंतरच्या विविध भावनिक समस्या मांडतांना दिसून येतात त्यामध्ये ''अ रेनी डे'', ''पुणे ५२'', ''प्रेम न्हणजे प्रेम असत'', ''प्रेमाची गोष्ट'', ''गुलमोहर'' व ''शेवरी'' अशा चित्रपटाचा समावेश आहे. अशा विषयावरचा सतीश राजवाडे यांचा ''प्रेमाची गोष्ट'' हा अतिशय सुन्दर चित्रपट आहे.

''मित्रा''च्या निमित्ताने

रवी जाधव यांच्या ''मित्रा'' लघुपटाला या वर्षी सर्वोकृष्ठ लघुपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. ''मित्रा'' हा लघुपट ''बॉयोस्कोप'' या चित्रपटाचा भाग आहे. चार कविता व त्या कवितांवर आधारित चार लघुपट असे या चित्रपटाचे स्वरुप आहे. ''चार दिग्दर्शक, चार कविता, एक चित्रपट'' अशी टैग लाईन या चित्रपटाला देण्यात आली आहे. रवी जाधव, विजु माने, गजेन्द्र अहिरे, गिरीश मोहीते यांनी संदीप खरे, किशोर कदम ''सौमित्र'', ग़ालिब व लोकनाथ यशवंत यांच्या कवितांवर आधारित लघुपटांचे दिग्दर्शन केले आहे. 

रवी जाधव दिग्दर्शित ''मित्रा'' मध्ये वीणा जामकर, मृगमयी देशपांडे व संदीप खरे यांच्या प्रमुख भूमिका आहे. संदीप खरे यांच्या कवितेवर व विजय तेंडुलकर यांच्या कथेवर आधारित या लघुपटामध्ये संदीप खरे पहिल्यांदाच अभिनय करताना दिसणार आहे. रवी जाधव यांनी १९४७ च्या काळातील दोन मैत्रिणींची हि कथा ब्लैक एंड व्हाइट पदध्तीने चित्रित केली आहे. 


रवी जाधव यांनी ''नटरंग'', ''बालगंधर्व '', ''बालक पालक'' व ''टाइमपास''च्या माध्यमातून रसिकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ''मित्रा''च्या निमित्ताने ''नटरंग''नंतर पुन्हा एकदा राष्ट्रिय पुरस्काराची मोहर त्यांच्या कर्तृत्वावर उमटली आहे. त्यांच्या येणाऱ्या ''टाईमपास २'' चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे.  

''बॉयोस्कोप''मध्ये विजु माने यांनी किशोर कदम ''सौमित्र'' यांच्या कवितेवर आधारित ''एक होता काऊ'' या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. ''एक होता काऊ'' मध्ये कुशल बद्रिके व स्पृहा जोशी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. विद्याधर जोशी, संपदा जोगळेकर व आनंद म्हैस्कर यांची साथ त्यांना लाभली आहे. ''एक होता काऊ'' मध्ये गोरीपान मुलगी व तिच्यावर प्रेम करणाऱ्या साधारण मुलाची गोष्ट आहे. 

''गोजिरी'', ''ती रात्र'', ''शर्यत'' व ''खेळ मांडला'' या चित्रपटांचे दिग्दर्शक विजु माने वेगवेगळ्या विषयावर अतिशय देखणे चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. प्रेक्षक त्यांच्या येणाऱ्या ''चूक भूल द्यावी घ्यावी'' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. ''चूक भूल द्यावी घ्यावी'' हा मराठीतील पहिला रोड मूवी प्रकरातील चित्रपट असणार आहे. 

''बॉयोस्कोप''मध्ये गजेन्द्र अहिरे यांनी ग़ालिब यांच्या गझलेवर आधारित ''दिले नादान'' या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. या लघुपटामध्ये नीना कुलकर्णी व सुहास पळशीकर यांची प्रमुख भूमिका आहे. ह्या लघुपटाच्या माध्यमातून गजेन्द्र अहिरे यांनी खानदानी कलावंताच्या उतारवयातील ठहराव मांडलाय.  

गजेन्द्र अहिरे मागील तीन दशकांपासून नाटक, टीवी व चित्रपटांच्या माध्यमातून कार्यरत असून त्यांना राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी ''विठ्ठल विठ्ठल'', ''नॉट ओनली मिसेस राउत'', ''सरीवर सरी'', ''सैल'', ''सावर रे'', ''त्या रात्री पाऊस होता'',''नातिगोती'', ''दिवसानं दिवस'', ''बयो'', ''शेवरी'', ''एक क्रांतिवीर - वासुदेव बलवंत फड़के'', ''गुलमोहर'', सुम्भराण'', ''पारध'', ''समुद्र'', ''एका शब्दात सांगतो'',  ''हैल्लो जयहिन्द'', ''पिपानी'', ''टूरिंग टॉकीज'', ''अनुमति'', ''पोस्टकार्ड'', ''अनवट'', ''स्वामी पब्लिक लिमिटेड'' सारखे वेगवेगळ्या सामाजिक विषयावर आशयपूर्ण व सुन्दर चित्रपट बनवले आहे. अतिशय कमी वेळात चित्रपट बनवण्यासाठी ते प्रसिद्ध असेल तरी त्यांचा प्रत्येक चित्रपट एक वेगळा अनुभव असतो. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये ''नीलकंठ मास्टर'' व ''टाच'' या चित्रपटाचा समावेश आहे.     

''बॉयोस्कोप''मध्ये गिरीश मोहीते यांनी लोकनाथ यशवंत यांच्या कवितेवर आधारित ''बैल'' या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. या लघुपटामध्ये मंगेश देसाई, स्मिता ताम्बे, सागर करंडे व उदय सबनीस प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ''बैल'' हि कथा शेतकऱ्यांची त्याच्या बैलावर असलेल्या प्रेमाची गोष्ट आहे.

यापूर्वी गिरीश मोहिते यांनी ''तुला शिकवीन चांगला धड़ा'', ''पिकनिक'', ''हि पोरगी कुणाची'', ''बे दुने साडे चार'', ''मनातल्या मनात'', ''प्रतिबिम्ब'', ''भारतीय'' व  ''गुरु पूर्णिमा''च्या माध्यमातून वेगवेगळे विषय मराठीत हाताळले आहे व ते प्रेक्षकांच्या पसन्तीत उतरले आहे.   

हिंदी चित्रपटांमध्ये अनेक लघुपटांना मिळून एक पूर्ण लांबीचा चित्रपट बनवण्याचे अनेक प्रकार झाले आहेत पण कवितांवर लघुपट करण्याची अभिनव कल्पना पहिल्यांदाच करण्यात अाली आहे.

Friday, 27 March 2015

जस्ट गम्मत

आज मिलिंद अरुण कवडे दिग्दर्शित ''जस्ट गम्मत'' हा मल्टीस्टारर मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. या अाधी मिलिंद अरुण कवडे यांनी ''४ इडियट्स'' व ''येड्याची जत्रा'' हे दोन मराठी चित्रपट दिग्दर्शित केले आहे. ''जस्ट गम्मत'' हा सुद्धा विनोदी चित्रपट आहे. या सोबतच त्यांचा आगामी ''१२३४ '' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे.  

''जस्ट गम्मत''मध्ये जितेंद्र  जोशी, संजय नार्वेकर, अदिती सारंगधर, विजय पाटकर, जयवंत वाडकर, स्मिता गोंदकर, अतुल तोडनकर, दिपक शिर्के अशी तगड़ी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षा करुया.

Wednesday, 25 March 2015

पुन्हा एकदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची ''सुवर्ण''मुद्रा

या वर्षी पुन्हा एकदा मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची ''सुवर्ण''मुद्रा उमटवलेली आहे. २०१४ चा सर्वोकृष्ट चित्रपटाचा सुवर्ण कमळ सम्मान चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित ''कोर्ट'' या मराठी चित्रपटाला प्राप्त झालेला आहे. ''कोर्ट'' चित्रपट भारतीय न्याय व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर एका वृद्ध शाहीराची गोष्ट सांगतो. या चित्रपटाला या आधी अनेक राष्ट्रीय व अंतर-राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधून पुरस्कारांसोबतच समीक्षकांचा अतिशय सकारात्मक प्रतिसाद प्राप्त झाला आहेत. या वरूनच मराठी चित्रपट सध्या किती उंच भरारी घेतोय हे स्पष्ट होते. हा चित्रपट येत्या १७ अप्रैलला प्रदर्शित होणार आहे.

''ख्वाडा'' या चित्रपटाचे  दिग्दर्शक बाबुराव कऱ्हाडे यांना विशेष जूरी पुरस्कार प्राप्त झाला सोबतच सर्वोकृष्ट ध्वनी संयोजनाचा पुरस्कारही ''ख्वाडा''साठी महावीर सब्बनवाल यांना प्राप्त झाला आहे. सर्वोकृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित ''एलिज़ाबेथ एकादशी'' या चित्रपटाला प्राप्त झाला आहे. सर्वोकृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार अविनाश अरुण दिग्दर्शित ''किल्ला'' या चित्रपटाला मिळाला आहे. सर्वोकृष्ट लघुपटाचा मान रवी जाधव दिग्दर्शित ''मित्रा''ला मिळाला आहे.

गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने बाजी मारताना दिसून येत आहे. २०० ४ ते २ ०१४ या गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मराठी चित्रपटांनी सातत्याने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये चमकदार कामगीरी केली आहे. उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन,अभिनय, संगीत, संहिता, संवाद अशा सर्वच क्षेत्रात मराठी चित्रपटांनी पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. उत्कृष्ट सामाजिक चित्रपट व उत्कृष्ट बाल कलाकार या श्रेणीत तर कायम मराठी चित्रपटाचा वरचष्मा राहिला आहे. या वर्षी पुरस्कार मिळवण्याळया चित्रपटांसह गेल्या दहा वर्षात देवराई,उत्तरायण, गिरणी, एक सागर किनारी, इट्स प्रभात, द्विजा, डोम्बिवली फास्ट, शेवरी, टिंग्या, निरोप, जोगवा, गंध, हरीचंद्राची फैक्टरी, नटरंग, बाबू बैंड बाजा, चैंपियंस, मी सिंधुताई सपकाळ, मला आई व्याहाचय, पिस्तुल्या, देऊळ, शाळा, बालगंधर्व, विष्णुपंत दामले - बोलपटाचे मूकनायक, जय भीम कामरेड, ऐरावत,धग, अनुमती, संहिता, इन्वेस्टमेंट, फँड्री, अस्त, आजचा दिवस माझा या चित्रपटांनी, त्यातील कलवंतांनी व तंत्रज्ञांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवून मराठी चित्रपट सृष्टीला नवी भरारी दिली आहे. या सर्व नव-नवीन कथा, कल्पना, सामाजिक आशय, दिग्दर्शक, कलावंत व तंत्रज्ञांनी आपल्या मराठी चित्रपटांला अधिकाधिक समृध्द केले आहे. 

Sunday, 22 March 2015

''हंटर''च्या निमित्ताने

सध्या ''हंटर'' या हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने सई ताम्हणकर व राधिका आपटे या दोन मराठमोळ्या अभिनेत्रींचे नाव चर्चेत आहे. सई ताम्हणकर यांनी आपल्या करियरच्या सुरवातीपासूनच या आधी ''गजनी'' व ''ब्लैक एंड व्हाईट'' या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. तर राधिका आपटे यांनी मराठी सोबतच हिंदी, बंगाली, तेलगू, तामील आणि मल्यालम अशा विविध भाषिक चित्रपटांमधून अभिनय केला आहे. मराठी मुलाची गोष्ट असल्यामुळे साहजिकच ''हंटर''मध्ये सई ताम्हणकर व राधिका आपटे यांच्यासोबतच हंटर मध्ये रविन्द्र मंकणी, नीना कुलकर्णी, ज्योति सुभाष आणि विवेक तत्ववादी अशी मराठी कलाकारांचा अभिनय बघायला मिळणार आहे. अलीकडे प्रदर्शित झालेल्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका होत्या, अनुराग कश्यप दिग्दर्शित ''अग्ली'' मध्ये गिरीश कुलकर्णी यांच्या भूमिकेची सकारात्मक दखल सर्वच समीक्षकांनी घेतली होती. ''अब तक छप्पन २'' मध्ये तर नाना पाटेकर यांच्या सोबतच विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर व ऋषिकेश जोशी अशी दमदार मराठी कलाकारांची फौजच होती. सध्या बॉलीवुड मध्ये मराठी कलाकारांची चलती आहे असेच न्हणावे लागेल.      

ज्याप्रमाणे सध्या दर दुसऱ्या किवा तिसऱ्या मराठी चित्रपटात बॉलीवुडमधील कलाकार दिसून येतात त्याच प्रमाणे बॉलीवुडमध्ये सध्या मराठी कलाकार दिसून येत आहेत. मागे एका मराठी अभिनेत्रीने तिच्या मुलाखतीत ''बॉलीवुड मध्ये छोटया भूमिकेसाठीही खुप चांगले पैसे मिळतात'' असे सांगितल्याचे आठवते. बॉलीवुड मध्ये काम करणारे अनेक मराठी कलाकार आहेत पण मराठी हीरो मात्र बॉलीवुडमध्ये बोटांवर मोजण्याइतकेच आहेत.

पूर्वी लक्ष्मण बर्डे सारखे मराठी सुपरस्टार हिंदी मध्ये चरित्र कलाकाराच्या भूमिका करायचे तर त्यांच्यावर टिका व्हायची. अशोक सराफ मात्र मराठी बरोबर हिंदी चित्रपटांतही नियमितपणे सक्रिय राहिले. मराठी व हिंदी दोन्ही ठिकाणी नियमितपणे सक्रिय असलेल्या मराठी कलाकारांमध्ये सचिन पिळगावकर, सदाशिव अमरापुरकर, रमेश देव, विक्रम गोखले, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, विनय आपटे, मोहन जोशी, शिवाजी साटम, विजय पाटकर, सचिन खेडेकर, अजिंक्य देव, संदीप कुलकर्णी, संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, राजेश श्रृंगारपुरे, नागेश भोसले, अनंत जोग, यतिन कार्येकर, उदय टिकेकर, प्रसाद ओक यांची नावे ठळकपणे घेता येईल, हि यादी बरीच लांब आहे. मराठी व हिन्दी सोबतच अतुल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, महेश मांजरेकर व सयाजी शिंदे यांनी दाक्षिणात्य चित्रपटांतही बरेच नाव कमावले आहे. मराठी अभिनेत्यांप्रमाणे, मराठी अभिनेत्रीही हिंदी व इतर भाषिक चित्रपटात तितक्याच सामर्थ्यपणे कार्यरत आहेत, ''हंटर''च्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.  

महेश मांजरेकर निर्मित व दिग्दर्शित हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक मराठी कलाकारांना संधी दिली आहे, त्यांच्या वास्तव, प्राण जाये पण शान ना जाये, जिस देश में गंगा रहता है, सिटी ऑफ़ गोल्ड सारख्या चित्रपटांमधून अनेक मराठी कलाकारांची फौज दिसते. सचिन कुंडलकर यांच्या ''अय्या'' मधून सुबोध भावे यांनी हिंदित डेब्यू केला होता. रोहित शेट्टी यांनी पण ''गोलमाल'' सीरीज व ''सिंघम'' सीरीज मध्ये श्रेयस तलपडे, सचिन खेडेकर, अश्विनी कळसेकर, सोनाली कुलकर्णी, जीतेन्द्र जोशी यांनी भूमिका केल्या आहेत.

Monday, 16 March 2015

मराठी सिनेमा बोल्ड होतोय

द्वीअर्थी संवाद व गाणी मराठी चित्रपटाला काही नवी नाहीत पण सध्या मराठी चित्रपट दिवसेंदिवस अधिकाधिक बोल्ड होताना दिसून येत आहे. मागील महिन्यात प्रदर्शित झालेला ''चित्रफित'' असो वा मराठी चित्रपटांमधील वाढत असलेले किसिंग सीन्स व बिकनी सीन्स याच गोष्टींकडे लक्ष्य वेधतात.

गजेन्द्र अहिरे यांनी ''नॉट ओनली मिसेस राउत '', ''त्या रात्रि पाऊस होता'', ''सुम्भरान'' व ''पारध'' सारख्या चित्रपटांमधून बोल्ड विषय अतिशय संवदेनशीलपणे हाताळले आहे. मागील काही वर्षात ''नटरंग'', ''लालबाग परळ'', ''काकस्पर्श'', ''रेला रे'', ''पुणे ५२'', ''बालक पालक'' व ''तप्तपदी'' असे अनेक बोल्ड विषय व बोल्ड सीन्स असलेले मराठी चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. गिरीश कुलकर्णी व सई ताम्हणकर यांच्या मधील बोल्ड सीन्स मुळे ''पुणे ५२''ची बरीच चर्चा झाली. ''नो एंट्री पुढे धोका आहे'' व ''अशाच एका बेटावर'' मधील सई ताम्हणकर यांच्या बिकनी सीन्सची ही बरीच चर्चा झाली. 

अलीकडच्या काळात मराठी मध्ये बरेच किसिंग सीन्स बघायला मिळाले आहे. त्यामध्ये उपेन्द्र लिमये व मुक्ता बर्वे यांचा ''जोगवा'', पुष्कर जोग व मानसी नाइक ''जबरदस्त'', आदिनाथ कोठारे व उर्मिला कानेटकर यांचा ''अनवट'' व ''दुभंग'', उमेश कामत व प्रिया बापट यांच्या ''टाइम प्लीज'', अमृता सुभाष यांच्या ''सैटरडे संडे'', स्वप्निल जोशी व सोनाली कुलकर्णी यांच्या ''मितवा'' मधील किसिंग सीनचा उल्लेख करता येईल.

Sunday, 15 March 2015

सीक्वलची सुनामी

हॉलीवुडमध्ये सीक्वलचा खुप जूना इतिहास आहे. बॉलीवुडमध्येही मागील दहा ते पंधरा वर्षात अनेक चित्रपटाचे सीक्वल निघाले, पण त्यात प्रेक्षकांना चांगला चित्रपट देण्याऐवजी मागील चित्रपटाची ब्राण्ड वैल्यू वापरण्यावर अधिक भर होता त्यामुळे बॉलीवुडमधील बऱ्याच सीक्वल चित्रपटांना तिकीट खिडकीवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता हे सीक्वलचे लोण मराठी चित्रपटांमध्येही पसरायला लागले आहे. येणाऱ्या काळात मराठी चित्रपटाच्या सीक्वलची लाट नव्हे सुनामी बघायला मिळणार आहे.

अलीकडे ''झपाटलेला २'', ''चिंटू २'' व ''पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा'' वगळता फारसे सीक्वल मराठी चित्रपट सृष्टीमध्ये बघायला मिळाले नाहीत. या पैकी ''झपाटलेला २'' वगळता इतर चित्रपटाची चर्चाही फार झाली नाही. पण आता हे चित्र पूर्णपणे बदललेले बघायला मिळणार आहे. ''टाइम पास २'', ''अग बाई अरेच्या २'', ''मुंबई पुणे मुंबई २'', ''पोस्टर बॉयज़ २'' व ''क्लासमेट्स २'' हे मराठी चित्रपटाचे सीक्वल निर्मितीच्या वेगवेगळया अवस्थेत आहेत. या पैकी ''टाइम पास २'' व ''अग बाई अरेच्या २'' या सीक्वलसचे ट्रेलर प्रसिद्ध झाले असून त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ''मुंबई पुणे मुंबई २''चे चित्रीकरण सुरु आहे. ''पोस्टर बॉयज़''चे निर्माते व प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तलपदे आता ''पोस्टर बॉयज़ २''च्या निमित्ताने दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसणार आहे. याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ''क्लासमेट्स''च्या सक्सेस पार्टीत ''क्लासमेट्स २'' ची घोषणा करण्यात आली आली आहे. एका वेबसाइटवर आलेल्या बातमीनुसार पुष्कर जोग यांनी त्यांच्या जबरदस्त या चित्रपटाच्या सीक्वल असलेल्या ''जबरदस्त २'' या चित्रपटाची घोषणा केली आहे.

मराठी चित्रपटाचे सीक्वल हे मराठी चित्रपटांमध्ये वाढत असलेल्या व्यावसायिकतेचे उदाहरण आहे, यामुळे मराठी चित्रपट सृष्टि अधिकाधिक समृद्ध होण्यासच मदत होणार आहे. सोबतच या चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद सीक्वलची लाट किती वेळ टिकेल हे ठरवणार आहे.

Saturday, 14 March 2015

ट्रेलरनामा

आज रवी जाधव यांच्या ''टाइम पास २'' चा पहिला ट्रेलर रीलीज झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरला यू-टुब वर पहिल्याच दिवशी तेवीस हजारपेक्षा जास्त प्रेक्षकांनी बघितले आहे. मराठी चित्रपटाच्या ट्रेलरला मिळणारा हा अभूतपूर्व प्रतिसाद नक्कीच मराठी चित्रपटाची उज्वल वाटचाल सिद्ध करणारा आहे. या ट्रेलरचे वैशिष्टये न्हणजे, या माध्यमातून पहिल्यांदाच चित्रपटाचे नायक व नायिका प्रेक्षकांच्या समोर येत आहे. आता पर्यन्त ''टाइम पास २'' चे नायक व नायिका कोण याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता बरीच ताणली गेली होती. या ट्रेलरच्या माध्यमातून प्रियदर्शन जाधव, दगडू न्हणजे नायक व प्रिया बापट, प्राजक्ता न्हणजे नयिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांपुढे आलेले आहेत. ''टाइम पास २'' चा ट्रेलर अतिशय मनोरंजक झाला असून ''टाइम पास'' प्रमाणे ''टाइम पास २'' सुद्धा तुम्हाला मनोरंजनाची हमी देतो.   

''टाइम पास २'' सोबतच सुमित राघवन अभिनीत ''संदूक'', संजय नार्वेकर व जीतेन्द्र जोशी अभिनीत ''जस्ट गम्मत'', सोनाली कुलकर्णी अभिनीत ''अग बाई अरेच्या २'', वैभव तत्ववादी व भूषण प्रधान अभिनीत ''कॉफी आणि बरेच काही'', संतोष जुवेकर अभिनीत ''बाइकर्स अड्डा'', सचिन खेडेकर अभिनीत ''शटर'' व जीतेन्द्र जोशी अभिनीत ''काकण'' या चित्रपटांचे ट्रेलर ही यू-टुब वर मराठी चित्रपट रसिकांचे लक्ष्य वेधून घेत आहे.

काही गोष्टी बघूनच प्रेक्षक चित्रपट बघायचा की नाही बघायचा हे ठरवतो, त्यापैकी ट्रेलर ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ट्रेलरच्या माध्यमातून चित्रपटाची गोष्ट व त्यातील युएसपी थोडक्यात प्रेक्षकांपर्यंत पोहचवता येते. त्यामुळे हल्ली मराठी चित्रपटाच्या ट्रेलर वरती ही बरेच काम होताना दिसून येते. त्यामुळेच प्रेक्षक मराठी चित्रपटाप्रमाणेच त्याचे ट्रेलर ही आवडीने बघतो किंबहुना कधी कधी तर ट्रेलर ची वाट बघत असतो. एकूण काय तर सामान्य प्रेक्षक चित्रपटाच्या ट्रेलर वरूनच त्यांचा दर्जा ओळखतो पण दर वेळेस त्याचे अंदाज खरे निघातीलच असेही नाही.        

सध्या मराठी चित्रपटांची संख्या, निर्मिती मुल्ये व बजट मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहेत. त्याच प्रकारे मराठी चित्रपटाची प्रसिद्धी व विपणन या क्षेत्रात वेग-वेगळे प्रयोग होताना दिसत आहे, कारण आता मराठी चित्रपटांमध्येही तीव्र स्पर्धा निर्माण झाली असून अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचवायचे असल्यास त्याला पर्याय नाही. सध्या मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धिमध्ये सोशल मीडियाचा वापर हमख़ास करण्यात येतो, त्यात फेसबुक व यू-टुब यांचा वापर मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धिसाठी खुप कल्पकतेने करण्यात येत आहे. यू-टुब वर वाढलेली मराठी चित्रपटाच्या ट्रेलरची संख्या ह्याचेच उदहारण आहे. यू-टुबच्या माध्यमातून येणाऱ्या चित्रपटाच्या प्रसिद्धिसाठी निशुल्क व वैश्विक माध्यम निर्मात्यांसाठी उपलब्ध आहे व त्याचा वापर ते करतायेत हे अत्यंत महत्वाचे आहे. हल्ली यू-टुब सोबतच मराठी चित्रपटाच्या बद्दल माहिती देणाऱ्या वेबसाइट्स वरती ही मराठी चित्रपटाचे ट्रेलर्स गाजत असतात.      

Friday, 13 March 2015

बुगडी माझी सांडली ग

आज ''बुगडी माझी सांडली ग'' हा चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटाच्या माध्यमातून मिस इंडिया दिवा मानसी मोघे चित्रपट सृष्टीत पदार्पण करीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मानसिंग पवार यांनी केले असून या आधी त्यांनी ''आकांत'', ''नाइट स्कूल'' व ''पोलिसाची बायको'' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात कश्यप परुलेकर व मानसी मोघे यांची प्रमुख भूमिका आहे, सोबतच मोहन जोशी व रमेश भटकर ही या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट लावणी प्रधान असून प्रेमकथेवर बेतला आहे.

सोबतच आज ''पिकली'' व ''जरा जपून करा'' हे मराठी चित्रपट ही प्रदर्शित झाले आहे.   

Wednesday, 4 March 2015

कट्टी बट्टी

उद्या ''कट्टी बट्टी'' हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजेंद्र पवार असून या चित्रपटाच्या निमित्ताने एक आगळी वेगळी लव-स्टोरी मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नायक व नायिका नवोदित कलाकार असून त्यांना अरुण नलावडे , विलास उजवणे या सारख्या जेष्ठ कलाकारांची साथ मिळाली आहे.

किरण नाटकी