Monday, 16 May 2016

सैराटच्या निमित्ताने

सहसा मी चित्रपटगृहात चित्रपट बघायला जात नाही कारण चित्रपट चांगला नसेल तर उगाच वेळ आणि पैसा वाया जातो. त्यामुळे मी कोणताही चित्रपट बघायला जायच ठरवण्याआधी चित्रपटाचा दिग्दर्शक आपला आवडता आहे का? चित्रपटात आपल्या आवडीची स्टार कास्ट आहे का? ट्रेलर बघणे? समीक्षा वाचणे इत्यादि खातरजमा करुन घेतो. त्यातही चित्रपटगृहात मराठी चित्रपट बघायला माझी प्राथमिकता असते. ''सैराट''चा ट्रेलर मी बघितला होता, पण मला काही तो विशेष आवडला नव्हता कारण चित्रपटाच्या ट्रेलर बघून ही दुखद प्रेमकहानी वगैरे असेल असा माझा समज झाला होता. मंगळवारी संध्याकाळी कोणाशी तरी फोनवर झगडा होतो. मग काय मूड ऑफ. आता काय कराव? चला चित्रपट बघुया. लॅपटॉपमध्ये काही बघण्यासारख नव्हतच. मग विचार केला काय बघाव तर चला "सैराट" बघुया पण माझ्या "सैराट"कडून फार अपेक्षा नव्हत्या आणि हा चित्रपट खुप गम्भीर वगैरे असेल अशी माझी भावना होती. तिकडे गेल्यावर गर्दी बघून मला धक्काच बसला, मंगळवार (चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून पाचवा दिवस) असून सुद्धा शो हाउसफुल होता. मराठी चित्रपटाला असा प्रतिसाद मिळतोय हे बघून आनंद पण झाला. उज्जवल सरांना कशीतरी बालकनीची दोन टिकिट मिळाली. 

चित्रपट सुरु होताच पहिल्या काही फ्रेममध्ये नागराज मंजुळे पद्यावर दिसतात. खर म्हणजे मला दिग्दर्शकांना अभिनय करताना बघून नेहमीच मजा येते मग ते छोट्या भूमिकेत का असेना. आणि मग हळू हळू "सैराट" मला आवडु लागतो. क्रिकेट मैचच्या प्रसंगाला सुरवात होते. मग आपल्याला आपल्या गावाकडले क्रिकेट सामने आठवतात आणि आपण चित्रपटात गुंतत जातो. एक एक प्रसंग बघून आपल्याला आपल्या शाळेतल्या गोष्टी आठवू लागतात. दरम्यान छोट्या छोट्या प्रसंगातून प्रेक्षकांच्या चेहर्यावर हसु फुलत राहत. सोबत पद्यावर परश्या आणि आर्चीच प्रेम फुलत जात. मध्ये मध्ये गाणे आणि त्यात प्रेक्षकांचा जल्लोष.

आता आपल्याला माहिती असत की कधीतरी अचानक चित्रपट गंभीर वळण घेणार. अपेक्षेप्रमाणे चित्रपट गंभीर वळण घ्यायला लागतो. परश्या आणि आर्ची पळून जातात. आता उरलेल्या चित्रपटभर पाठलाग बघावा लागणार. नाही यार. आता माझे लक्ष पुन्हा मोबाईलवर केंद्रित होते. काही मिस कॉल दिसतात. उज्जवल सरांना पण काही महत्वाचे फोन आलेले असतात आणि आम्ही इंटरवलच्या १० मिनट आधी चित्रपटगृहाच्या बाहेर पडतो. पूर्ण चित्रपट बघितला नाही पण जितका बघितला तितका छान होता, याच समाधान वाटत राहत.

नंतर आम्ही आपल्या कामात व्यस्त. कधी तरी फेसबुक उघडतो तर पूर्ण वॉल "सैराट"विषयी उलट सुलट चर्चा आणि समीक्षणे यांनी भरलेली असते. त्याचा शेवट आणि रक्ताने माखलेले पावल चर्चेचा विषय झाले असतात. "सैराट"विषयी व्हाट्सउप मैसेज यायला लागतात. वर्तमानपत्रात सैराटच्या कमाईची चर्चा, टीवीवर पैनल डिस्कशन सुरु असतात. उगाच आपण अर्धा चित्रपट बघितला अस वाटत. पुन्हा पावल चित्रपटगृहाकडे वळतात, याही वेळेस तेवढीच गर्दी किंबहुना थोडी जास्तच, तोच जल्लोष आणि डोक सुन्न करणारा शेवट पण यावेळी नागराज मंजुळे माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक बनलेले असतात.

No comments:

Post a Comment

किरण नाटकी