Monday 13 October 2014

मराठीत स्त्री दिग्दर्शकांची भरारी

सध्या मराठी चित्रपटांची संख्या चांगलीच वाढली असून आपला मराठी चित्रपट नवनविन विषय घेऊन पुढे येत आहे. त्यामुळे अनेक कलाकार व दिग्दर्शक यांना संधी मिळत आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांवरुन सहज लक्षात येते की मराठीमध्ये महिला दिग्दर्शकांचे नवीन पर्व सुरु झाले आहे. मागील काही महिन्यात जवळ पास प्रत्येक आठवड्यात महिला दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ऑगस्ट महिन्यांमध्ये सुमित्रा भावे यांचा ''अस्तु'' आणि मृणाल कुलकर्णी यांचा ''रमा माधव'' प्रदर्शित झाला, त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मनवा नाईक दिग्दर्शित ''पोरबाजार'', मृणालिनी पाटिल दिग्दर्शित ''राखणदार'' व ह्या शुक्रवारी समृद्धि पोरे यांचा ''डॉ प्रकाश बाबा आमटे'' व रेणु देसाई यांचा ''इश्क़वाला लव'' प्रदर्शित झाला आहे. दोन्ही चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मराठी चित्रपटांमध्ये सक्रिय असलेल्या महिला दिग्दर्कांमध्ये कांचन अधिकारी व सुमित्रा भावे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल कारण त्यांनी सातत्याने अनेक चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना दिलीय. मध्यंतरी रेणुका शहाणे यांनी ''रीटा'' च्या निमित्ताने आपल्या दिग्दर्शकीय कौशल्य दाखवले होती. महिला दिग्दर्शकांच्या येणाऱ्या आगामी चित्रपटांमध्ये संगीता बालचंद्रन यांच्या ''चिंतामणी'', क्रांति रेडकर यांच्या ''काकण'' आणि स्वप्ना वाघमारे जोशी यांच्या ''मितवा''चे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. यावरून आता हे महिला दिग्दर्शकांचे पर्व असेल सुरु राहणार याची शाश्वती मिळते. 

विशेष न्हणजे फक्त दिग्दर्शक न्हणुनच नव्हे तर चित्रपटांमध्ये इतर ही क्षेत्रात त्यांचा वावर वाढतो आहे. मागच्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ''सांगतो ऐका''च्या निर्माता विधि केसलीवाल आहेत. त्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ''टपाल''च्या निर्मात्या वर्षा सत्पालकर आहेत. या सर्व बाबी मराठी चित्रपटांमध्ये महिलांचा वाढता वावर स्पष्ट करणाऱ्या आहे. 

No comments:

Post a Comment

किरण नाटकी