Showing posts with label marathi movie review. Show all posts
Showing posts with label marathi movie review. Show all posts

Friday, 16 January 2015

कलरफुल मराठी मूवी - क्लासमेट्स

उलाढाल, सतरंगी रे व नारबाची वाड़ी नंतर दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आता ''क्लासमेट्स'' हा दर्जेदार मराठी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. निखळ मनोरंजन करणारा असा ''क्लासमेट्स'' आहे. सध्या युवक ही मराठी चित्रपटांकडे वळतोय व त्याच्या आवडी निवडी लक्षात घेऊन चित्रपट बनवले जातात, ''क्लासमेट्स'' हा असाच चित्रपट आहे.    

''क्लासमेट्स'' मध्ये सर्वच कलाकारांचा अभिनय अगदी बघण्यासारखा आहे. ''क्लासमेट्स'' मध्ये युवा कलाकारांची फ़ौज असली तरी सर्वच कलाकार आपल्या भूमिकेत भाव खाऊन जातात, ख़ास करून अंकुश चौधरी आणि सचित पाटिल यांच्या अभिनयाची जुगलबंदी बघण्यासारखी आहे. सुशांत शेलार व सुयश टिळक यांनी त्यांना चांगली साथ दिली आहे. सई ताम्हणकर व सोनाली कुलकर्णी यांच्या सोबतच प्रगति पाटिल सुद्धा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यास यशस्वी ठरल्या आहेत. या चित्रपटानंतर सिद्धार्थ चांदेकर यांच्या चाहत्यांमध्ये वाढ होणार आहे.    

''क्लासमेट्स''मध्ये दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी चित्रपटाची प्रत्येक फ्रेम कशी मनोरंजक होईल याकडे कटाक्षाने लक्ष्य दिले अाहे. चित्रपटाची गोष्ट ही महाविद्यालयातील विद्यार्थी राजकारणाविषयी आहे. या चित्रपटात रहस्य हे शेवटी उलगडण्यात आल्याने शेवटपर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा ताणली जाते. चित्रपटाचे छायांकन या चित्रपटाची विशेषता आहे. 

चित्रपटात काही गाणी जबरदस्ती टाकल्यासारखी वाटतात. चित्रपटाचे कलाकार व महाविद्यालयीन वातावरण बघता दुनियादारीची आठवण तुम्हाला येऊ शकते.   

शेवटी हा चित्रपट तुम्हाला खुप मोठा सन्देश देणार नाही मात्र अडीच तास मनोरंजन नक्की करेल, तेव्हा आपल्या ''क्लासमेट्स'' सोबत चित्रपट बघायला विसरु नका. 

Saturday, 29 November 2014

''प्रकाशवाटा'' ते ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो''

मी आज ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' बघितला, हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्याची इच्छा होती पण एकूण कामाचा व्याप बघता ते आज शक्य झाले. आज चित्रपट प्रदर्शित होऊन ५१ दिवसानंतरही हा चित्रपट बघण्यासाठी बऱ्यापैकी गर्दी होती. ८व्या आठवड्यातही हा चित्रपट गर्दी खेचतोय हेच ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो''चे व मराठी चित्रपटाचे मोठे यश आहे.

जवळपास तीन वर्षापुर्वी ''मी सिंधुताई सपकाळ'' बघितला होता, हा चित्रपट सिंधुताई सपकाळ यांच्या ''मी वनवासी'' या आत्मचरित्रावर आधारित होता. आत्मचरित्रावर आधारित हा एक उत्तम चित्रपट आहे. ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' याच परंपरेतला चित्रपट आहे. 

या वर्षाच्या सुरुवातीला मी डॉ प्रकाश आमटे यांचे आत्मकथन ''प्रकाशवाटा'' वाचले होते, त्यात त्यांनी वर्णन केलेले हेमलकसा मधील सुरुवातीचे दिवस, त्यांना आलेल्या अडचणी, अनुभव सगळेच अंगावर काटा आणणारे होते. हे पुस्तक वाचल्यावर तुम्ही संवेदनशील झाल्याशिवाय राहत नाही. कमी अधिक प्रमाणात हाच अनुभव ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' बघून येतो.

डॉ प्रकाश बाबा आमटे यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत मिळून हेमलकसा येथे जंगलात शून्यातून विश्व उभारले. विविध समस्यांना तोंड देत, तेथील आदिवासी समाजाला प्रतिकूल परिस्थितीत आयोग्यसेवा उपलब्ध करून दिली. तेवढ्यावरच न थांबता तिथे शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देत, तेथील आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ते करीत आहेत.

एक चित्रपट न्हणुन ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' मध्ये काही उणिवा असल्या तरी या चित्रपटाची कथा थेट मनाला भिडणारी आहे. विश्वास वाटायला कठीण अशी ही सत्यकथा आहे. नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, मोहन आगाशे यांच्या सोबतच सर्व सहकलाकारांचा अभिनय अगदी प्रभवशाली आहे. वास्तविक लोकेशन्सवर चित्रपट चित्रित झाल्यामुळे चित्रपटाचा प्रभाव वाढवण्यास मदत झाली आहे. चित्रपट बघताना प्रेक्षक हरवून जातातच पण चित्रपट संपल्यावर येणारे आमटे कुटुंबिय व कार्यकर्ते यांचे फोटोज बघण्यासाठी पण थांबतात, यासाठी आपण खास करून समृद्धि पोरे यांचे अभिनन्दन करायला हवे ज्यांनी हे प्रेरणादायी कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यास मदत केली आहे.

या चित्रपटात बऱ्याच वैद्यरभीय व नागपूरच्या कलाकारांनी अभिनय केला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून विदर्भात चित्रीकरण झालेल्या चित्रपटात आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे.

''प्रकाशवाटा'' ते ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' मधील मुख्य प्रेरणा आहे, बदल. ज्या प्रकारे डॉ प्रकाश बाबा आमटे यांनी गडचिरोलीच्या आदिवासी समाजात सकारात्मक बदल घडून आणला आहे. त्याच प्रकारे आपण स्वत मध्ये व आपल्या समाजात काय सकारात्मक बदल घडून आणतो हेच महत्वाचे आहे. 

Wednesday, 19 November 2014

एलिजाबेथ एकादशी - चित्रपट समीक्षा

लहान मुलांवर आधारित मराठी चित्रपटाचा ''श्वास''पासून सुरु झालेला प्रवास टिंग्या, फंड्री व टपाल, ते आता ''एलिजाबेथ एकादशी'' पर्यन्त येऊन पोहचलाय.

एक चांगली कथा, एक प्रतिभावंत दिग्दर्शक व त्याला कलाकारांच्या उत्तम अभिनयाची साथ मिळाली की ''एलिजाबेथ एकादशी''चा योग येतो. मुळात या चित्रपटामध्ये कुठलाही प्रसिद्ध कलाकार नाही पण सर्वच बाल कलाकारांनी अगदी धमाल केली आहे. त्याला सर्वच कलाकारांनी मोलाची साथ दिली आहे. ''एलिजाबेथ एकादशी''ची वन-लाइन स्टोरी खुप गंभीर अाहे पण ती कथा परेश मोकाशी यांनी खूपच मनोरंजक पद्धतीने सादर केल्यामुळे चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही. एका क्षणाला हसवणारा व दुसऱ्याच क्षणाला अन्तर्मुख करायला लावणारा असा एलिजाबेथ एकादशी आहे. वैज्ञानिक न्यूटन काय न्हणतात? ते तुम्हाला माहित असेलच पण संत न्यूटन काय न्हणतात? ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला ''एलिजाबेथ एकादशी'' बघावा लागेल.  

पंढरपूरच्या वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरमध्ये राहणाऱ्या ''ज्ञानेश'' या मुलाची, त्याच्या कुटुंबाची, त्याच्या ''एलिजाबेथ'' या त्याच्या सायकलवर असलेल्या त्याच्या प्रेमाची व त्याच्यापोटी त्यांने केलेल्या संघर्षाची ही गोष्ट आहे. या चित्रपटातील पात्र तुम्ही तुमच्या आजुबाजूला पण बघु शकता. काही प्रसंगात तुमचे लहानपण किवा तुमच्या मुलांचे लहानपण तुम्हाला आठवण्याची शक्यता आहे.
  
हा पूर्णपणे दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. अगदी कला दिग्दर्शनापासून ते छायाचित्रण सगळ्याच बाबीत चित्रपट सरस झाला आहे. या चित्रपटात एकच गाणे आहे ते चित्रपटाच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत आपली सोबत करते, पण पूर्ण चित्रपटांमध्ये पार्श्वसंगीताचाही महत्वाचा वाटा आहे. चित्रपटाचा कालावधी फक्त १ तास व ३० मिनट असणे हे पण ''एलिजाबेथ एकादशी''चे बळस्थान आहे.   

चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत गुंतवून ठेवणारा ''एलिजाबेथ एकादशी'', मराठी येणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून बघायला हवा …

किरण नाटकी